‘मॉयल’ करणार बेरोजगारी दूर

By Admin | Updated: January 18, 2015 00:55 IST2015-01-18T00:55:58+5:302015-01-18T00:55:58+5:30

स्थानिक मॅगनीज खाणीची उत्पादन क्षमता ५० हजार टन आहे. नवीन व्हर्टीकल शॉफ्टमुळे ही उत्पादनक्षमता दुपटीने वाढणार आहे. त्यामुळे अधिकाधिक बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे.

'Moyal' to remove unemployment | ‘मॉयल’ करणार बेरोजगारी दूर

‘मॉयल’ करणार बेरोजगारी दूर

नरेंद्रसिंह तोमर : मनसर खाणी नवीन व्हर्टिकल शॉफ्टचे उद्घाटन
मनसर : स्थानिक मॅगनीज खाणीची उत्पादन क्षमता ५० हजार टन आहे. नवीन व्हर्टीकल शॉफ्टमुळे ही उत्पादनक्षमता दुपटीने वाढणार आहे. त्यामुळे अधिकाधिक बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. मॉयलने तरुणांना स्किल डेव्हलपमेंटचे प्रशिक्षण दिल्यास बेरोजगारांना सहज रोजगार मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय पोलाद व खाण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले.
मॉयलच्या मनसर खाणीत शनिवारी व्हर्टीकल शॉफ्टचे तोमर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, आ. डी. मल्लिकार्जुन रेड्डी, आ. जोगेंद्र कवाडे, माजी आ. आशिष जयस्वाल, मॉयलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक जी. पी. कुंदरगी, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष योगेश वाडीभस्मे, रामअवतार देवांगण, ज्ञानेश्वर ढोक आदी मान्यवर व्यासपीठावर विराजमान होते. तोमर म्हणाले, विदर्भात नवीन खाण पट्ट्यांचे पुनर्निरीक्षण केल्यास मॉयलला वाव आहे. या संदर्भात राज्य शासनाने केंद्राकडे प्रस्ताव सादर केल्यास विदर्भात मॉयलच्या खाणी विकसित करता येऊ शकतात. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. यासाठी वेळोवेळी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
नितीन गडकरी म्हणाले, व्हर्टीकल शॉफ्टमुळे मनसर खाणीची उत्पादनक्षमता दुपटीने वाढणार आहे. त्यामुळे ४०० बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. रामटेक परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करणे तसेच पर्यटकांना आकर्षित करणे गरजेचे आहे. स्किल डेव्हलपमेंट केल्यास पाच वर्षांत ४ कोटी ७० लाख तरुणांच्या हाताला काम मिळणार असल्याचे प्रतिपादन गडकरी यांनी केले. भारतात मॉयलचा वाटा ६० टक्के असून, हा वाटा १०० टक्क्यांवर नेण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याची सूचना गडकरी यांनी केली. नागपूर व भंडारा जिल्ह्यात मॅगनीजचा मोठा साठा असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले. या भागात केंद्र सरकारने पुन्हा सर्वेक्षण करावे.
त्यातून या भागात १० ते १५ नवीन खाणी तयार होऊ शकतात. कोंडेगाव व परसोडा येथेही वाव आहे. यासाठी लागणारी वीज सरचार्ज कमी करून उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले. कार्यक्रमाचे संचालन पूनम कुकरेजा यांनी केले तर ए. के. झा यांनी आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: 'Moyal' to remove unemployment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.