जुळ्या मुलींसह आईची आत्महत्या
By Admin | Updated: January 19, 2015 00:55 IST2015-01-19T00:55:43+5:302015-01-19T00:55:43+5:30
दोन वर्षांच्या जुळ्या मुलींसह आईने स्वत:च्या अंगावर घरी रॉकेल ओतून जाळून घेतले. यात गंभीररीत्या जळाल्याने दोन्ही मुलींसह आईचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना खापरखेडा

जुळ्या मुलींसह आईची आत्महत्या
जाळून घेतले : नवीन बिना भानेगावातील घटना
खापरखेडा : दोन वर्षांच्या जुळ्या मुलींसह आईने स्वत:च्या अंगावर घरी रॉकेल ओतून जाळून घेतले. यात गंभीररीत्या जळाल्याने दोन्ही मुलींसह आईचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवीन बिना भानेगाव येथे रविवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली.
रुहिना जावेद शेख (२२, रा. नवीन बिना भानेगाव, ता. सावनेर) असे मृत आईचे तर आफिया आणि तायबा (२) अशी मृत जुळ्या मुलींची नावे आहेत. जावेद आणि रुहिना यांचा तीन वर्षांपूर्वी निकाह (विवाह) झाला. जावेद हा परिवारासह त्याचे आजोबा अब्दुल कादीर शेख (७०) यांच्या घरी राहतो. जावेद आणि त्याचे आजोबा अब्दुल कादीर हे दोघेही हातठेल्यावर बांगड्या विकण्याचा व्यवसाय करतात.
रविवारी सकाळी जावेद, त्याचे आजोबा आणि आजी बांगड्या विकण्यासाठी घराबाहेर गेले होते. त्यामुळे रुहिना व मुली घरी होत्या. सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास रुहिनाने दोन्ही मुलींना स्वयंपाक घरात नेले. त्यानंतर स्वत:च्या व मुलींच्या अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले.
काही वेळातच ओरडण्याचा आवाज आल्याने शेजाऱ्यांनी स्वयंपाकघराकडे धाव घेतली. स्वयंपाक घराचे दार आतून बंद असल्याने शेजाऱ्यांनी ते तोडले. तेव्हा त्यांना रुहिना व दोन्ही मुुली जळाल्याने गंभीर जखमी अवस्थेत पडल्या असल्याचे आढळून आले.
गुन्हे दाखल करण्याची मागणी
रुहिनाने रविवारी सकाळी तिच्या वडिलांना फोन करून प्रकृती बरी नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे रुहिनाचे वडील इसार शेख (५२, रा. मोठा ताजबाग, नागपूर) लेक व नातीच्या भेटीसाठी नवीन बिना भानगोव येथे येण्यास निघाले होेते. ते वाटेत असतानाच रुहिनाने मुलींसह स्वत:ला जाळून घेतल्याची बातमी मिळाली. दरम्यान, रुहिनाचे नातेवाईक मेयो रुग्णालयात पोहोचले. त्यांनी या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. जावेदचे वडील बिना संगम येथे राहतात. आजोबा अब्दुल कादीर यांच्याकडे वरच्या माळ्यावर जावेदचे काका राहतात. घर खाली करण्यावरून जावेद व त्याचे काका यांच्यात भांडणे होत असल्याची सूत्रांनी दिली.