मुलावरील लैंगिक छळाविरुद्ध मातेची याचिका
By Admin | Updated: July 12, 2014 02:26 IST2014-07-12T02:26:40+5:302014-07-12T02:26:40+5:30
‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या व्यक्तीकडून आपल्या सात वर्षीय मुलाचा करण्यात आलेल्या लैंगिक छळाविरुद्ध एका मातेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर..

मुलावरील लैंगिक छळाविरुद्ध मातेची याचिका
नागपूर : ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या व्यक्तीकडून आपल्या सात वर्षीय मुलाचा करण्यात आलेल्या लैंगिक छळाविरुद्ध एका मातेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी रिट याचिका दाखल केली असून, या याचिकेवर न्यायालयाने प्रतिवादी सोनेगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाला दोन आठवड्यात उत्तर मागविणारी नोटीस जारी केली आहे. या महिलेने याचिकेत धक्कादायक माहिती नमूद केली आहे. आपण मिलिंद भोळे नावाच्या व्यक्तीसोबत राहत असताना तो आपल्या सात वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार करीत होता. या दृश्याचे चित्रीकरण आपण खुद्द आपल्या मोबाईलने केले. प्रारंभी भोळे हा आपणास आणि मुलाला खोलीत डांबून ठेवून कामानिमित्त निघून जायचा. त्यानंतर तो घरात विवस्त्रस्थितीत वावरायचा, त्यानंतर त्याने वारंवार आपल्या या चिमुकल्यावर लैंगिक अत्याचारास सुरुवात केली. या असहाय दृश्याचे आपण चित्रीकरण करून २९ एप्रिल २०१४ रोजी पोलीस ठाण्यात तक्रार केली असता, आपली तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करण्यात आली.
पोलीस निरीक्षक शाह यांनी हे दृश्य पाहून असा प्रकार विदेशा सामान्य आहे, तुम्ही समझोता करून टाका, तुम्हाला मदत करतो, असे म्हटले होते. ५ जून रोजी पोलीस आयुक्तांकडे तक्रार करूनही या अधिकाऱ्याने गुन्हा दाखल केला नव्हता. ही बाब वृत्तपत्रात प्रसिद्ध होताच सोनेगाव पोलिसांनी ६ जून रोजी मिलिंद भोळे याच्याविरुद्ध लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण या कायद्यांतर्गत तब्बल दीड महिन्यानंतर गुन्हा दाखल केला. परंतु अद्यापही आरोपीला अटक केली नाही. आरोपीची आणि अत्याचारग्रस्त आपल्या मुलाची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली नाही. सोनेगाव पोलिसांकडून या प्रकरणाच्या तपासाचा अहवाल मागविण्यात यावा, पोलीस निरीक्षकाकडून हा तपास काढून अन्य कोणत्याही अधिकाऱ्याकडे तपास सोपविण्यात यावा, आरोपीला ताबडतोब अटक करण्याचे निर्देश द्यावे, बालकांविरुद्ध होणाऱ्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, राज्यात सर्वत्र या कायद्याचे काटेकोर पालन होण्याच्या संदर्भात पोलीस महानिरीक्षकांना निर्देश देण्यात यावे, अशी प्रार्थनाही या मातेने केली आहे. न्यायालयात याचिकाकर्त्या मातेच्यावतीने अॅड. स्मिता सरोदे सिंगलकर आणि अॅड. असीम सरोदे काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)