आईचा पदरच झाला फास !
By Admin | Updated: December 1, 2014 00:54 IST2014-12-01T00:54:43+5:302014-12-01T00:54:43+5:30
आईच्या साडीमध्ये फसून एका १० वर्षीय मुलीचा करुण अंत झाला. सुरेंद्रनगर येथील धनगरपुरा येथे हा अपघात घडला. राणी अनिलप्रसाद तिवारी असे मृत मुलीचे नाव आहे. राणी खामला येथील सिंधी हिंदी

आईचा पदरच झाला फास !
सुरेंद्रनगरात शोककळा : खेळता खेळता घडली घटना
नागपूर : आईच्या साडीमध्ये फसून एका १० वर्षीय मुलीचा करुण अंत झाला. सुरेंद्रनगर येथील धनगरपुरा येथे हा अपघात घडला. राणी अनिलप्रसाद तिवारी असे मृत मुलीचे नाव आहे. राणी खामला येथील सिंधी हिंदी हायस्कूलमध्ये चौथ्या वर्गाची विद्यार्थिनी होती. तिचे वडील खानसामा आहेत. कुटुंबात वडिलांसह आई अर्चना, बहीण लल्ली (७) आणि भाऊ अमन (११) हे आहेत. राणी आणि लल्ली सिंधी हिंदी हायस्कूलमध्ये शिकतात तर अमन संस्कार कॉन्व्हेंटमध्ये शिकतो.
घटनेच्या वेळी दुपारी ४.४५ वाजताच्या सुमारास अर्चनासह तिघेही घरी होते. घराच्या मागच्या बाजूला शौचालय आहे. सायंकाळी ५ वाजता राणी वस्तीतील इतर मुलींबरोबर ट्युशनला जात होती. ट्युशनला जाण्याची वेळ झाल्याने राणी तयार होण्यासाठी बाथरूममध्ये गेली. बाहेरच तारेवर आईची साडी व इतर दुसरे कपडे वाळू घातले होते. बाथरूममधून बाहेर निघाल्यावर राणी वाळू घातलेल्या साडीत आपला चेहरा लपवून गोल फिरू लागली. साडीत राणीचे तोंड फसल्याने गुदमरून ती बेशुद्ध झाली. दरम्यान, तिच्या गळ्यात साडी फासासारखी आवळल्या गेली. ती स्वत:ला वाचविण्यासाठी तडफडू लागली. तिचा आवाज ऐकून आई धावली.
तिची अवस्था पाहून ती मदतीसाठी ओरडू लागली. आरडाओरड ऐकून शेजारीही धावले. शेजाऱ्यांनी राणीला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु तिची प्रकृती अतिशय नाजूक असल्याने तिला दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगण्यात आले. दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे धनगरपुरा वस्तीत हळहळ व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
आई प्रचंड मानसिक धक्क्यात
ट्युशनची वेळ झाल्याने आई अर्चना राणीची वाट पाहत होती. उशीर होत असल्याने तिने राणीची स्कूल बॅगही तयार करून ठेवली होती. राणीचा आवाज ऐकून ती बाहेर धावली. आपलीच साडी मुलीच्या मृत्यूचे कारण बनल्यामुळे अर्चनाला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.