नागपुरात मायलेकींनी केली तरुणीला मारहाण : व्हिडीओ व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 00:55 IST2018-12-28T00:54:36+5:302018-12-28T00:55:42+5:30
जरीपटक्यातील मायलेकींनी एका तरुणीवर चोरी तसेच संवेदनशील आरोप लावून तिला भररस्त्यावर बेदम मारहाण केली. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला.

नागपुरात मायलेकींनी केली तरुणीला मारहाण : व्हिडीओ व्हायरल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जरीपटक्यातील मायलेकींनी एका तरुणीवर चोरी तसेच संवेदनशील आरोप लावून तिला भररस्त्यावर बेदम मारहाण केली. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला.
घरकाम करणाऱ्या तरुणीवर मायलेकींनी चोरीचा आळ घेतला. त्याचप्रमाणे तू घरातील माणसाला बिघडवते, असा आरोप करून तिला तिच्या घरातून बेदम मारहाण करीत रस्त्यावर आणले. पीडित तरुणी गरीब कुटुंबातील आहे. ती आरोप नाकारून मायलेकीसमोर हातपाय जोडत होती. मात्र, आरोपी मायलेकींनी तिला केस धरून रस्त्यावर खेचत आणले. बुधवारी दुपारी घडलेल्या या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, तरुणीच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी मायलेकीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
जरीपटक्यात अशा प्रकारे महिनाभरात घडलेली ही तिसरी घटना आहे. गुन्हा मात्र पहिल्यांदाच दाखल झाला. पहिल्या घटनेत कापड विक्रेत्यांनी एका कपडे चोरणाऱ्या तरुणीला बेदम मारहाण करून तिचा व्हिडीओ बनविला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाला. मात्र, समझोत्याच्या नावाखाली पोलिसांनी आारोपींवर गुन्हा दाखल करण्याचे टाळले. दुसरी घटना एका नेत्याशी संबंधित होती. नेता, पत्नी आणि मैत्रिणीमधील वादाचे प्रकरण आधी जरीपटका ठाण्यात आणि तेथून मेयोत पोहचले. रुग्णालयात ‘उपदेशाचे डोज’ मिळाल्यानंतर प्रकरणात तक्रार देण्याचे टाळण्यात आले. एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी लज्जास्पद वर्तनाचा विषयही जरीपटक्यातीलच होय.