अभियांत्रिकीमध्ये ‘पीएचडी’साठी सर्वाधिक इच्छुक
By Admin | Updated: August 12, 2016 02:44 IST2016-08-12T02:44:10+5:302016-08-12T02:44:10+5:30
साधारणत: ‘पीएचडी’साठी कला व विज्ञान शाखेतील उमेदवारांचा सर्वात जास्त कल असतो असा समज आहे.

अभियांत्रिकीमध्ये ‘पीएचडी’साठी सर्वाधिक इच्छुक
नागपूर विद्यापीठ : ‘पेट’ साठी सव्वाचार हजारांहून अधिक अर्ज दाखल
नागपूर : साधारणत: ‘पीएचडी’साठी कला व विज्ञान शाखेतील उमेदवारांचा सर्वात जास्त कल असतो असा समज आहे. परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अभियांत्रिकी विद्याशाखेत ‘पीएचडी’ करण्यासाठी सर्वात जास्त उमेदवार इच्छुक आहेत. ‘पीएचडी’ नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या ‘पेट’ परीक्षेचे दुहेरी आव्हान असूनदेखील सव्वाचार हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात सुमारे २८ टक्के उमेदवार एकट्या अभियांत्रिकी शाखेचे आहेत.
नागपूर विद्यापीठातर्फे यंदा घेण्यात येणाऱ्या ‘पेट’ परीक्षेचे उमेदवारांसमोर दुहेरी आव्हान आहे. नोंदणीला पात्र होण्यासाठी २ पेपर ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण करावे लागणार आहेत. शिवाय विद्यापीठाने ‘पीएचडी’साठी इतर नियमदेखील कडक केले आहेत.
त्यामुळे यंदा मागील वर्षीच्या तुलनेत फारच कमी अर्ज येतील, असे अधिकाऱ्यांना वाटत होते. सुरुवातीला अर्जांची संख्यादेखील कमी होती. ‘आॅनलाईन’ अर्ज भरण्याची अखेरची तारीख १० आॅगस्ट ही होती. विद्यापीठाकडे ४ हजार २८५ अर्ज आले. यापैकी ४ हजार १७७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शुल्क भरून अर्ज भरले आहेत.
नागपूर विद्यापीठाची ‘पेट’ ही ६६ विविध विषयांसाठी घेण्यात येणार आहे. यात सर्वात जास्त उमेदवार हे अभियांत्रिकी शाखेतील आहेत. या शाखेतील १ हजार ३२० विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित केले आहेत. सर्वात कमी ४५ अर्ज हे विधी शाखेच्या विद्यार्थ्यांकडून आले आहेत. (प्रतिनिधी)
व्यवसाय व्यवस्थापनात ३३७ तर अरेबिकमध्ये एकाचा अर्ज
नागपूर विद्यापीठाअंतर्गत वाणिज्य विद्याशाखेअंतर्गत येणाऱ्या व्यवसाय व्यवस्थापन विषयात ‘पेट’ देण्यासाठी ३३७ जणांनी अर्ज भरले आहेत. ‘मेकॅनिकल’ अभियांत्रिकीमध्ये ३०२ तर संगणक विज्ञान अभियांत्रिकीत २९९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. विज्ञान शाखेतून रसायनशास्त्र विषयातून सर्वाधिक १७७ अर्ज आले आहेत. तर कला विद्याशाखेतील इंग्रजी विषयात १६२ अर्ज दाखल झाले आहेत. या विद्याशाखेतील अरेबिक विषयात केवळ एकाचाच अर्ज आला आहे.