More than two lakh citizens make metro travels in Nagpur | नागपुरात दोन लाखांहून नागरिकांनी केली 'मेट्रो वारी'
नागपुरात दोन लाखांहून नागरिकांनी केली 'मेट्रो वारी'

ठळक मुद्दे‘मेट्रो’साठी ६ हजार कोटींहून अधिक निधी खर्च : माहिती अधिकारातून खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनतर्फे’ संचालित करण्यात येत असलेल्या नागपुरच्या ‘माझी मेट्रो’च्या कामावर आतापर्यंत सहा हजार कोटींहून अधिक निधी खर्च झाला आहे. ‘माझी मेट्रो’चा आतापर्यंत एकच टप्पा वाहतुकीसाठी खुला झाला असून सात महिन्यांतच दोन लाखांहून अधिक नागरिकांनी ‘मेट्रो’तून प्रवास केला आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि.कडे विचारणा केली होती. ‘माझी मेट्रो’साठी आतापर्यंत किती निधी खर्च झाला आहे, किती प्रवाशांनी ‘मेट्रो’तून प्रवास केला व त्यातून किती महसूल मिळाला, ‘मेट्रो’तर्फे किती रस्ते बांधण्यात आले व त्यात किती निधी वापरण्यात आला इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार ‘मेट्रो’चा मिहान ते सिताबर्डी या टप्प्यावर ३ मार्चपासून वाहतुकीला सुरुवात झाली. तर लोकमान्य नगर ते सीताबर्डी हा तिसरा टप्पा पूर्ण झाला आहे. प्रजापती नगर ते सीताबर्डी (चौथा टप्पा) तसेच ऑटोमोटिव्ह चौक ते सीताबर्डी (दुसरा टप्पा) या दोन्ही टप्प्यांचे काम सुरू आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम डिसेंबर २०२० मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे.
पहिल्या टप्प्यात ८ मार्च ते ३ ऑक्टोबर या कालावधीत २ लाख १५ हजार १९२ प्रवाशांनी प्रवास केला. यातून ४१ लाख ८६ हजार ८६० रुपयांचा महसूल प्राप्त झाला. ३० सप्टेंबरपर्यंत ‘मेट्रो’च्या एकूण कामांसाठी ६,२३७ कोटी ३४ लाख रुपये खर्च झाले होते.

रस्त्यांसाठी कोट्यवधींचा खर्च
दरम्यान, ‘मेट्रो’तर्फे रस्तेदेखील बांधण्यात येत आहेत. दुसऱ्या टप्प्यातील मार्गावर ४.६३ किमीचा मार्ग बांधण्यात आला असून यासाठी ३ कोटी ७९ लाख रुपये खर्च करण्यात आले. तर चौथ्या टप्प्याच्या मार्गावर १६ किमीचा रस्ता बांधण्यासाठी ९ कोटी ८६ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. यातील ५ किमीचा रस्ता बांधण्यात आला असून यासाठी ३ कोटी ६९ लाख ५४ हजार ४३ रुपये खर्च झाले आहेत. तिसऱ्या टप्प्याच्या मार्गावर १०.८१६ किमीपैकी ३.८ किमी मार्ग बांधण्यात आला आहे.

डागडुजीसाठी १५ कोटींचा खर्च
‘मेट्रो’च्या कामादरम्यान रस्तेमार्गाचे नुकसान झाले होते. त्याच्या डागडुजीसाठीदेखील आतापर्यंत १५ कोटींहून अधिकचा खर्च करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी ५३ लाख, तिसऱ्या टप्प्यासाठी १३ कोटी ६३ लाख तर चौथ्या टप्प्यासाठी १ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी डागडुजीसाठी खर्च करण्यात आला.

Web Title: More than two lakh citizens make metro travels in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.