लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील रस्त्यांवर आणि फुटपाथवर सध्या मृत्यूचे सापळे पसरले आहेत. सिव्हरेज आणि गटार लाईनवरील चेंबरची तब्बल १० हजारांहून अधिक झाकणे तुटलेली किंवा पूर्णतः उघडी पडली आहेत. पावसाळ्यात गुडघाभर साचणाऱ्या पाण्यात ही चेंबर्स दिसत नाहीत आणि कोणत्याही क्षणी नागरिकांचा किंवा प्राण्यांचा जीव गमवण्याचा धोका कायम आहे. महापालिका मात्र या गंभीर समस्येकडे लक्षच देत नाही. जिथे लक्ष दिले जात आहे, तिथे काम मात्र शून्य, अशी स्थिती आहे.
पावसात अनेक रस्ते सरळ तलावात रूपांतरित होतात. नागरिकांचे हाल, वाहनांचे नुकसान आणि अपघात हे दरवर्षीचे चित्र असते. हे सर्व महापालिकेला माहीत असूनही कोणतीही ठोस कृती दिसून येत नाही. पूर्वी लावलेली लोखंडी झाकणे चोरीला गेली. त्यानंतर लावलेली सिमेंट झाकणेदेखील चोरट्यांनी फोडून त्यातील लोखंडही चोरले. महापालिकेने फायबर मिक्स आणि एसएफआरसी झाकण बसविण्याचा निर्णय घेतला, पण निर्णय कागदावरच राहिला. पोलिस तक्रारी, योजना, निविदा सर्व काही झाले पण रस्त्यांवरील चेंबर्स अजूनही उघडेच आहेत.
१५ कोटींचा खर्च, योजना मात्र रखडलीमहापालिकेने प्रत्येक झोनसाठी १.५ कोटींच्या दराने दहा झोनसाठी एकूण १५ कोटींची तरतूद केली होती. या निधीतून १० हजार सिवरेज व ड्रेनेज चेंबरांसाठी झाकण बसवण्याची योजना होती. एप्रिलमध्येच निविदा प्रक्रिया झाली, पण अद्याप एकाही झोनमध्ये काम सुरु नाही.
तुटलेल्या झाकणांमुळे अपघातांचे प्रमाण वाढलेशहरातील अनेक ठिकाणी सिवरेज चेंबरची झाकणे तुटलेली किंवा उघडी आहेत. त्यामुळे नागरिक आणि जनावरांचे अपघात वाढले आहेत. पावसात ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरते. फुटपाथवर चालणेही नागरिकांसाठी धोक्याचे झाले आहे.