कोरोनाला आवरण्यासाठी अधिक कडक उपाययोजना : पालकमंत्र्यांचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 00:25 IST2021-02-28T00:23:34+5:302021-02-28T00:25:18+5:30
Nitin raut कोरोनाची लाट थोपविण्यासाठी राज्य सरकार आवश्यक त्या सर्व उपाययोजना करीत आहे. आवश्यकता भासल्यास अधिक कडक धोरण राबविल्या जाईल, असे वक्तव्य पालकमंत्री नितीन राऊत यांनी केले.

कोरोनाला आवरण्यासाठी अधिक कडक उपाययोजना : पालकमंत्र्यांचे संकेत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाची लाट थोपविण्यासाठी राज्य सरकार आवश्यक त्या सर्व उपाययोजना करीत आहे. आवश्यकता भासल्यास अधिक कडक धोरण राबविल्या जाईल, असे वक्तव्य पालकमंत्री नितीन राऊत यांनी केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने शनिवारी, रविवारी असे दोन दिवस बंद पाळण्याचा निर्णय जाहीर केला. आजच्या पहिल्याच दिवशी जनतेने बंदला कसा प्रतिसाद दिला, ते बघण्यासाठी पालकमंत्री राऊत यांनी शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता बाजारपेठेची पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलले. यावेळी त्यांच्यासोबत महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., पोलीस आयुक्त अमितेशकुमार होते.
कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जनतेचा जीव वाचविणे आमचे आद्यकर्तव्य आहे. त्यासाठी आवश्यकता भासल्यास कडक उपाययोजना करण्यात येईल, असे पालकमंत्री म्हणाले. त्यांनी जनतेला सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले. रविवारी स्पर्धा परीक्षेनिमित्त मोठ्या प्रमाणावर बाहेरगावचे उमेदवार नागपुरात येतील. त्यांची व्यवस्था जिल्हा प्रशासन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दारू कधीपासून झाली अत्यावश्यक?
बंदच्या दरम्यान अत्यावश्यक सेवेची वगळता दुसरी कोणतीही दुकाने सुरू राहणार नाहीत, असे प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र, ठिकठिकाणी देशी-विदेशी दारूची दुकाने सुरू असल्याचे आणि दुकानात मोठी गर्दीही असल्याचे चित्र आज बघायला मिळाले. त्यामुळे ‘दारूची दुकाने कधीपासून अत्यावश्यक सेवेत आली’, असा प्रश्न पत्रकारांनी केला. त्यावर बोलताना ‘हा विषय माझ्या अखत्यारित नाही. तो राज्य सरकारचा निर्णय आहे’, असे म्हणत पालकमंत्र्यांनी विषयाला बगल दिली.