नागपूर/अमरावती : सतत काेसळणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांसह नागरिकांनाही हैराण केले आहे. अशात हवामान विभागाने पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. येत्या २४ ते २७ सप्टेंबर यादरम्यान विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पावसाळी वातावरण तयार झाले आहे. या काळात जाेरदार पावसासह गारपीट हाेण्याचीही शक्यता आहे.
नैऋत्य मान्सून गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या काही भागांतून पुन्हा माघार घेत आहे, आणि येत्या काही दिवसांत उत्तर प्रदेश, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरच्या काही भागांतून माघार घेण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. विदर्भात मात्र परतीच्या प्रवासाला ५ ते १० ऑक्टाेबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान साेमवार १५ सप्टेंबर ते २० सप्टेंबरपर्यंत चार दिवस पावसाने विदर्भात जाेरदार हजेरी लावली हाेती. विशेषत: नागपुरात धाे-धाे पाऊस बरसला. दाेन दिवसांपासून आकाश निरभ्र झाले आहे. त्यामुळे आर्द्रता घटली असून पारासुद्धा वाढला आहे आणि नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. कमाल तापमान ३५ अंशावर गेले आहे. चंद्रपूर व वर्धासुद्धा ३५ अंशावर गेले आहेत.
दरम्यान मंगळवारी चंद्रपूर व अमरावती जिल्ह्यात मध्यम तीव्रतेच्या पावसाने हजेरी लावली. अमरावतीला सकाळपर्यंत २३.८ मिमी व चंद्रपूरला दिवसा १७ मि.मी. पाऊस झाला. नागपूरला दिवसभर निरभ्र असलेले आकाश सायंकाळी ढगांनी व्यापले हाेते. किरकाेळ थेंबही पडले. त्यामुळे बुधवारपासून अंदाजानुसार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
२४ ते २७ सप्टेंबर : राज्यातील कमी दाब प्रभावामुळे संपूर्ण विदर्भात अतिजोरदार मेघगर्जनेसह पाऊस.उत्तर महाराष्ट्र २६ सप्टेंबर : १ ऑक्टोबरदरम्यान जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार या भागात मध्यम ते जोरदार पाऊस होईल.२४ ते २५ : मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपात गडगडाटी पाऊस२६-१ ऑक्टोबर : कमी दाबाच्या प्रभावामुळे मुसळधार, पूरपरिस्थिती, शेतीचे प्रचंड नुकसान होणारा पाऊस.कोकण : संपूर्ण कोकणात या आठवड्यात हलका ते मध्यम पाऊस
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
२२ सप्टेंबर रोजी ईशान्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. २४ तासांच्या आत ते पश्चिम-वायव्येकडे वायव्य बंगालच्या उपसागराकडे सरकण्याची अपेक्षा आहे. म्यानमारकडे रगासा चक्रीवादळ येत असताना त्याचे अंश बळकटी देतील. त्याचे रूपांतर २५ सप्टेंबरच्या सुमारास कमी दाबात होईल. २६ सप्टेंबरच्या सुमारास दक्षिण ओडिशा-उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे.
"राज्यात या आठवड्यात संपूर्ण विभागात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याच काळात उत्तरेकडे मान्सून माघारी फिरत असल्यामुळे सौम्य गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही."- अभिषेक खेरडे, हवामान अभ्यासक, धोतरखेडा, अचलपूर