थायलंडसह देश-विदेशातील भिक्खूंची शांतीवनात धम्मवंदना; डॉ. आंबेडकरांना अनोखे अभिवादन
By आनंद डेकाटे | Updated: April 13, 2026 17:24 IST2026-04-13T17:22:16+5:302026-04-13T17:24:13+5:30
Nagpur : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त चिचोली शांतीवन बुद्ध विहार परिसरात अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले.

Monks from Thailand and abroad pay homage to the Buddha in peace; Unique greetings to Dr. Ambedkar
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त चिचोली शांतीवन बुद्ध विहार परिसरात अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. वाडी-खडगाव-फेटरी नजीक चिचोली येथे उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाच्या शांतीवन बुद्ध विहार परिसरात रविवारी रात्री हा विशेष सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात थायलंडसह देश-विदेशातील १३५ भिक्खूंनी सहभाग घेतला.
धम्मकाया फाउंडेशन, थायलंड तसेच इंडियन बुद्धिस्ट कौन्सिल शांतीवन चिंचोली प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय भंते लाउंग पोर धम्माजिओ यांच्या ८२ व्या जन्मदिनानिमित्त तसेच डॉ. आंबेडकर जयंतीच्या औचित्यावर १३५ भिक्खूंनी विशेष पंचशील धम्म वंदना सादर केली. दीपप्रज्वलन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याला अभिवादन करण्यात आले. थायलंडचे प्रमुख भंते कीर्ती पोंग व भंते सुमंगल यांनी विशेष वंदना सादर करताना सांगितले की, डॉ. आंबेडकर यांच्या कार्यामुळे तथागत बुद्धांचा शांततेचा धम्म पुन्हा नव्या जोमाने देश-विदेशात पोहोचला. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाजरचना देशाला सुखी आणि समृद्ध बनवू शकते, असा संदेश त्यांनी दिला. इंडियन बुद्धिस्ट कौन्सिल व शांतीवन प्रकल्पाचे प्रमुख संजय पाटील आणि प्रमुख अनुयायी चंद्रशेखर गणवीर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला तो १३५ भिक्खूंसह शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या अनुयायांचा मेणबत्ती प्रज्वलीत करून निघालेला शांतीमार्च. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय वस्तुसंग्रहालय प्रकल्प परिसरात काढण्यात आलेल्या या शांतिमार्चदरम्यान विश्वकल्याणासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.