नागपुरातील एटीएममध्ये तांत्रिक बिघाड करून रक्कम लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 20:51 IST2020-09-15T20:46:17+5:302020-09-15T20:51:04+5:30
एटीएममध्ये तात्पुरता बिघाड करून एका भामट्याने १ लाख ६७ हजार रुपये लंपास केले. १२ सप्टेंबरच्या सकाळी घडलेली ही अफलातून चोरीची घटना सोमवारी बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली.

नागपुरातील एटीएममध्ये तांत्रिक बिघाड करून रक्कम लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एटीएममध्ये तात्पुरता बिघाड करून एका भामट्याने १ लाख ६७ हजार रुपये लंपास केले. १२ सप्टेंबरच्या सकाळी घडलेली ही अफलातून चोरीची घटना सोमवारी बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली.
सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आशीर्वाद नगर द्वारका कॉम्प्लेक्स आहे. येथील पहिल्या माळ्यावर एसबीआयचे एटीएम आहे. १२ सप्टेंबरच्या सकाळी ६ ते ७.४६ या वेळेत एक भामटा एटीएम मध्ये आला. त्याने कार्ड स्वाईप केले आणि आतमधून १ लाख ६६ हजार रुपये काढून घेतले. बँकेचे कर्मचारी सोमवारी एटीएममध्ये रक्कम जमा करण्यासाठी आले. हिशेब केला असता त्यात १ लाख ६६ हजाराची रक्कम कमी आढळली. त्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एक आरोपी वारंवार कार्ड स्वाईप करून पेचकस सारखी वस्तू कॅश कटर मध्ये टाकून रक्कम काढत असल्याचे दिसून आले. रक्कम बाहेर येत असतानाच आरोपी कॅश कटरमध्ये पेचकस टाकत होता परिणामी व्यवहार पूर्ण होत नव्हता. त्या तांत्रिक बिघाडामुळे आरोपीला वारंवार रक्कम काढणे शक्य होत होते. हे लक्षात आल्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी सक्करदरा पोलिसांशी संपर्क साधला. चौकशीनंतर बँकेतर्फे श्रीधर भाऊरावजी केदार शिवनगर दुर्गापुर यांनी नोंदविलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.चोरट्याचा शोध घेतला जात आहे.