क्षण आनंदचा अन् दु:खचा!
By Admin | Updated: June 3, 2014 03:00 IST2014-06-03T03:00:47+5:302014-06-03T03:00:47+5:30
मुंबईमध्ये सुरू असलेल्या मेअर कप इंटरनॅशनल ग्रॅण्डमास्टर

क्षण आनंदचा अन् दु:खचा!
श्वेता गोळे : खेळ आणि शिक्षणातही ठेवले सातत्य राहुल भडांगे नागपूर मुंबईमध्ये सुरू असलेल्या मेअर कप इंटरनॅशनल ग्रॅण्डमास्टर टुर्नामेंटमध्ये उझबेकिस्तान विरुद्ध नागपूरच्या श्वेता गोळेचा सामना सुरू होता. सामना रंगात आला असतानाच तिच्या मैत्रिणीने १२ वीत नेत्रदीपक यश मिळविल्याची गोड बातमी दिली. या बातमीमुळे आनंदात हरवून गेलेल्या श्वेताची सामन्यावरची पकड सैल झाली आणि श्वेताला सामना गमवावा लागला. शिक्षणाच्या पटलावर यशस्वी झालेल्या श्वेताला बुद्धिबळाच्या पटलावर मिळालेली मात दु:ख देऊन गेली. आयुष्यात एकाच दिवशी आलेले हे सुखदु:खाचे क्षण कधीही विसरणार नाही, अशी प्रतिक्रिया श्वेताने दिली. बुद्धिबळाची आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून श्वेता प्रसिद्ध आहे. गेल्या दहा वर्षात तिने अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळल्या आहेत. लंडन, सिंगापूर, ब्राझील येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. अनेक राष्ट्रीय स्पर्धेत तिने उत्कृष्ट प्रदर्शन करीत सुवर्णपदक पटकाविले आहे. अनेक प्रसिद्ध खेळाडूंचा शैक्षणिक आलेख बघितल्यास, ते शिक्षणात अपयशी ठरल्याचे दिसून येतात. मात्र श्वेताने खेळ आणि अभ्यासात गुणवत्ता कायम ठेवली. ती विविध गटात ९ वेळा स्टेट चॅम्पियन राहिली आहे. सिंगापूर, ब्राझीलमध्ये झालेल्या ग्रॅण्डमास्टर स्पर्धेत सिल्व्हर मेडल पटकाविले आहे. खेळाचा सराव, स्पर्धा यामुळे शिक्षणाला खंड पडत असतानाही तिने दहावीत ८0 टक्के गुण घेतले. बारावीतही तिच्या डिसेंबरपर्यंत स्पर्धाच सुरू होत्या. अभ्यासासाठी तिला केवळ दीड महिन्याचा अवधी मिळाला. कॉर्मसमध्ये ती बारावी करीत असल्याने अकाऊंट तिच्या डोक्यावरून जात होते. ट्यूशनमध्ये घ्यायला कोणी तयार नव्हते. अशा परिस्थितीत एका शिक्षिकेने तिची मदत केली. या अल्पावधीत दिवस-रात्र मेहनत घेऊन बारावी उत्तीर्ण झाली. पुढे तिला आयएएसची तयारी करायची आहे. बुद्धिबळामुळे शिक्षणातही मिळाले यश आयुष्यात खेळणे अतिशय महत्त्वाचे आहे. खेळण्यामुळे शारीरिकदृष्ट्या माणूस मजबूत असतो, एकाग्रता वाढते, जिद्द निर्माण होते. त्यामुळे खेळाडूंसाठी कुठलेही क्षेत्र कठीण नाही. बुद्धिबळामुळे माझी एकाग्रता वाढली. स्मरणशक्ती वृद्धिंगत झाली. मला मिळालेल्या अवधीत जो काही अभ्यास केला त्याचा मला फायदा झाला. आयुष्यात कधीही खेळ सोडणार नसल्याचे श्वेताने सांगितले.