बालिकेचा विनयभंग तरुणास कारावास
By Admin | Updated: August 4, 2015 03:30 IST2015-08-04T03:30:58+5:302015-08-04T03:30:58+5:30
कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सात वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्यावरून एका तरुणाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश

बालिकेचा विनयभंग तरुणास कारावास
नागपूर : कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सात वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्यावरून एका तरुणाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश मोहम्मद सादीक मोहम्मद उमर यांच्या न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
आशिष बाळकृष्ण हाते (१९), असे आरोपीचे नाव असून तो उमरेड तालुक्याच्या हळदगाव येथील रहिवासी आहे. या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, आरोपी आशिष हा घटनेच्या दिवशी १९ फेब्रुवारी २०१३ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास पीडित बालिकेच्या घरी गेला होता. त्याने तिच्या आईला पोहे करून मागितले असता तिने नकार दिला होता. त्यानंतर त्याने घरी चणे आणले आहेत, ते भाजायचे आहेत, असे सांगून तुमच्या मुलीला घेऊन जातो, असे म्हटले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून तिने आपल्या सात वर्षाच्या मुलीला आशिषसोबत पाठविले होते. परंतु आशिषने तिला आपल्या घरी न नेता एका गोठ्यात नेऊन तिच्याशी कुकर्म करण्याचा प्रयत्न केला होता. ही मुलगी ओरडत असल्याने आणि त्याच वेळी तिची आई तिचा शोध घेत असल्याने ती आशिषसोबत गोठ्यात दिसली होती.
पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून कुही पोलिसांनी दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल करून आशिषला अटक केली होती. सहायक पोलीस निरीक्षक कुमरे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने आरोपी आशिषला भादंविच्या ३५४ -ए (१) कलमांतर्गत एक वर्ष सश्रम कारावास आणि दीड हजार रुपये दंड तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याच्या कलम १२ अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावास आणि दीड हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या दोन्ही शिक्षा आरोपीला एकत्र भोगाव्या लागतील. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील अजय माहूरकर तर आरोपीच्या वतीने अॅड. कैलास डोडाणी यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)