निवृत्त महिला डॉक्टरची निर्घृण हत्या करणारा मोकाटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 01:50 PM2021-11-29T13:50:00+5:302021-11-29T14:55:22+5:30

वृद्ध देवकीबाईंची अत्यंत निर्दयपणे हत्या करतानाच त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कानातील ७० ते ७५ हजारांचे दागिने जैसे थे होते. मारेकऱ्याने दागिन्यांना हात लावला नाही. त्यामुळे ही हत्या लुटमारीच्या उद्देशाने झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Mokatach who brutally murdered a retired female doctor | निवृत्त महिला डॉक्टरची निर्घृण हत्या करणारा मोकाटच

निवृत्त महिला डॉक्टरची निर्घृण हत्या करणारा मोकाटच

googlenewsNext
ठळक मुद्दे२४ तासांपासून पोलीस अंधारात मृत वृद्धेच्या अंगावरचे दागिने जैसे थे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नंदनवनमधील निवृत्त महिला डॉक्टर देवकीबाई जीवनदास बोबडे (वय ७८) यांची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीचा २४ तासांपेक्षा जास्त कालावधी होऊनही छडा लागलेला नाही. दरम्यान, शनिवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास ही घटना झाल्यापासून आरोपीचा छडा लावण्यासाठी पोलीस अंधारात चाचपडत आहेत. दुसरीकडे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडलेल्या या घटनेमुळे जनसामान्यांत तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.

टीबी हॉस्पिटलमध्ये सेवा देऊन निवृत्त झालेल्या देवकीबाई यांचे गायत्री कॉन्व्हेंट परिसरात दुमजली निवासस्थान आहे. खाली देवकीबाई त्यांच्या वृद्ध व अर्धांगवायूने पीडित पतीसह राहत होत्या. तर वरच्या माळ्यावर मुलगी डॉ. किशोरी संजय पांचभाई (वय ५२) त्यांच्या कुटुंबीयांसह राहते. किशोरी यांचे पतीही डॉक्टर असून त्यांचे स्वत:चे क्लिनिक आहे. देवकीबाई यांची दुसरी मुलगी लॅब टेक्निशियन असून ती तिच्या कुटुंबीयांसह निर्मल नगरीत राहते.

किशोरी आणि त्यांचे कुटुंबीय शनिवारी दुपारी १२.३० वाजल्यापासून घरीच होते. सायंकाळी ६.३० च्या सुमारास किशोरी क्लिनिकला जायला निघाल्या अन् दार उघडे दिसले म्हणून त्यांनी आईच्या घरात डोकावले असता देवकीबाई मृतावस्थेत दिसल्या. त्यांचा गळा चिरला होता. खुर्चीला दोन्ही हात प्लास्टीक टेप आणि कपड्याने बांधून होते. तोंडावरही कापड बांधून होते. खाली रक्ताचे थारोळे साचून होते. मारेकऱ्याने वृद्ध देवकीबाईंची अत्यंत निर्दयपणे हत्या करतानाच त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कानातील ७० ते ७५ हजारांचे दागिने जैसे थे होते.

मारेकऱ्याने दागिन्यांना हात लावला नाही. त्यामुळे ही हत्या लुटमारीच्या उद्देशाने झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एका असहाय वृद्धेची एवढ्या निर्दयपणे हत्या कोणत्या कारणामुळे करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आणि मारेकऱ्यांना हुडकून काढण्यासाठी नंदनवन पोलीस, परिमंडळ चारच्या उपायुक्तांचे पथक, गुन्हे शाखेच्या पथकासह सुमारे शंभरावर पोलीस कामी लागले आहेत. देवकीबाई यांचे नातेवाईक सध्या वेगळ्या मानसिक स्थितीत असल्याने पोलिसांनी त्यांना जास्त विचारपूस करण्याचे टाळले आहे.

लाखो-करोडोंचे बंगले, सीसीटीव्ही नाही
ज्या भागात ही हत्या झाली त्या परिसरात लाखो, करोडोंचे बंगले आहेत. मात्र, एकाही ठिकाणी सीसीटीव्ही नाही. आर्थिक स्थिती भक्कम असलेल्या देवकीबाई बोबडे आणि त्यांची मुलगी डॉ. किशोरी यांनीही स्वत:च्या निवासस्थानी सीसीटीव्ही लावून घेतले नाहीत. त्यामुळेसुद्धा मारेकऱ्याचा शोध लावण्यात अडसर निर्माण झाला आहे.

Web Title: Mokatach who brutally murdered a retired female doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.