सुनेच्या हत्येचा प्रयत्न करणारे मोकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:17 IST2021-01-13T04:17:47+5:302021-01-13T04:17:47+5:30
न्यायासाठी महिला धडकल्या ठाण्यात - आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - लग्नात मनासारखा हुंडा मिळाला ...

सुनेच्या हत्येचा प्रयत्न करणारे मोकाट
न्यायासाठी महिला धडकल्या ठाण्यात - आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - लग्नात मनासारखा हुंडा मिळाला नाही त्यामुळे कॉम्प्युटर इंजिनिअर असलेल्या सुनेला इमारतीच्या चौथ्या माळ्यावरून ढकलून तिची हत्या करण्याचा प्रयत्न करणारे आरोपी अद्याप मोकाट आहेत. परिणामी महिलांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, निर्धार महिला व बाल विकास समितीच्या महिलांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यावर धडक देऊन आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली.
न्यू नरसाळा भागातील ही घटना आहे.
कॉम्प्युटर इंजिनियर असलेल्या करिश्मा नामक तरुणीचा सॉफ्टवेअर डेव्हलपर असलेल्या साकेत तामगाडगेसोबत २० ऑगस्ट २०२० ला विवाह झाला होता. लग्नात मनासारखे आंदण मिळाले नाही म्हणून रुष्ट झालेल्या सासरच्यांनी करिश्माचा छळ सुरू केला. २३ डिसेंबरला सायंकाळी करिश्मा तिच्या इमारतीच्या चौथ्या माळ्यावरील सदनिकेच्या बालकनीत उभी असताना आरोपी सासरा भीमराव तामगाडगे याने तिला धक्का देऊन खाली पाडले आणि तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. करिश्मा गंभीर जखमी झाली असून सध्या खासगी इस्पितळात उपचार घेत आहे. या प्रकरणात हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी पती साकेत, सासरा भीमराव, सासू , नणंद आणि तिचा पती अशा पाच आरोपींवर हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. मात्र, दोन आठवडे होऊनही आरोपींना अटक केली नाही. त्यामुळे महिलांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर निर्धार महिला व बालविकास समितीच्या उपाध्यक्ष आणि नगरसेविका वंदना भगत यांच्या नेतृत्वात महिलांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात धडक देऊन आरोपींच्या अटकेची मागणी केली.
---
आंदोलनाचा इशारा
आरोपींना तातडीने अटक केली नाही तर महिला संघटनेतर्फे तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही यावेळी नगरसेविका भगत यांनी दिला. महिलांचा रोष लक्षात घेत हुडकेश्वर ठाण्यातील अधिकाऱ्यांनी त्यांना शांत केले. आरोपींचा शोध सुरू असून त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे आश्वासनही यावेळी पोलिसांनी दिले. यावेळी महिला शिष्टमंडळात नंदा गोडघाटे, जया पानतावणे, विशाखा कांबळे, सुजाता गायकवाड आदींचा सहभाग होता.
---