लतिफसह चौघांविरुद्ध ‘मोका’
By Admin | Updated: July 12, 2014 02:27 IST2014-07-12T02:27:47+5:302014-07-12T02:27:47+5:30
आयपीएस अधिकारी तथा कन्हान पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार गौरव सिंग यांना उडविण्याचा कट रचल्याप्रकरणी रेतीमाफिया लतिफ अन्सारीसह दोघांच्या विरोधात...

लतिफसह चौघांविरुद्ध ‘मोका’
पारशिवनी/खापरखेडा : आयपीएस अधिकारी तथा कन्हान पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार गौरव सिंग यांना उडविण्याचा कट रचल्याप्रकरणी रेतीमाफिया लतिफ अन्सारीसह दोघांच्या विरोधात पारशिवनी पोलिसांनी ‘मोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) अंतर्गत कारवाई केली. मोका अंतर्गक कारवाई करण्याची अलीकडच्या काळातील ग्रामीण पोलिसांची ही पहिलीच वेळ आहे.
लतिफ अन्सारी आणि रामसेवक कैथल अशी मोका लावलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी या प्रकरणात मंगेश गोधनकर आणि क्रिष्णा येडके या तिघांना आधीच अटक केली असून, रामसेवक कैथल याला गुरुवारी मध्यरात्री अटक करण्यात आली. लतिफचा भाऊ लईक अन्सारी आणि जामील शेख यांना पोलीस शोधत आहेत.
गौरव सिंग यांच्या नेतृत्वातील पथकाने २८ जूनच्या मध्यराची रोहणा व पारडी रेतीघाटांवर धाड टाकली असता, अवैध रेतीवाहतुकीचा एक ट्रक पसार झाला होता. या ट्रकचा पाठलाग करीत असताना लतिफच्या कटानुसार आरोपी ट्रकचालकाने गौरवसिंग यांना उडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. नशिब बलवत्तर म्हणून ते आणि अन्य पोलीस कर्मचारी बचावले. या प्रकरणी पारशिवनी पोलिसांनी भादंवि ३०७ व १२० (बी) अन्वये गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती.
स्थानिक गुन्हे शाखेने ४ जुलै रोजी या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे हाती घेतली. गुन्हे शाखेने लतिफच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या संपूर्ण गुन्ह्यांची माहिती गोळा केली आणि या गुन्हेगारांविरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांनी पोलीस महासंचालकांकडे सादर केला. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी गुरुवारी रात्री रामटेकचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दीपक साळुंखे यांना मोका अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिले.
त्यानुसार रेतिमाफिया लतिफ आणि कैथलविरुद्ध मोका अंतर्गत ३, १ (२), ३ (४) अन्वये कारवाई करण्यात आली. लतिफच्या अन्य साथीदारांवरही मोकांतर्गत कारवाई होणार आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील रेतामाफियांमध्ये खळबळ उडाली आहे. (तालुका/प्रतिनिधी)