पर्यटकांच्या आनंदासाठी मोहुर्ली होणार ‘मॉडेल’
By Admin | Updated: June 1, 2014 00:55 IST2014-06-01T00:55:24+5:302014-06-01T00:55:24+5:30
ताडोबा व्याघ प्रकल्पात देश-विदेशातील पर्यटक ज्या गावातून प्रवेश करतात त्या मोहुर्ली गावाची अवस्था अतिशय बिकट आहे. पर्यटकांना भारतातील गावांचा चेहरा इतका कुरुप दिसू नये म्हणून या गावाला

पर्यटकांच्या आनंदासाठी मोहुर्ली होणार ‘मॉडेल’
साईनाथ कुचनकार - चंद्रपूर
ताडोबा व्याघ प्रकल्पात देश-विदेशातील पर्यटक ज्या गावातून प्रवेश करतात त्या मोहुर्ली गावाची अवस्था अतिशय बिकट आहे. पर्यटकांना भारतातील गावांचा चेहरा इतका कुरुप दिसू नये म्हणून या गावाला चकचकीत करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेशद्वार मोहुर्ली या गावात आहे. या गावातूनच पर्यटकांना जावे लागते. मात्र गावात असलेल्या अनेक समस्या बघून पर्यटक नाक मुरडतात. यातून भारतातील गावांच्या मागासलेपणाचे चित्र विदेशी पर्यटकांना दिसून येते. हे चित्र बदलण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल आणि वनविभागाच्या अधिकार्यांनी गावाचा कायापालट करण्यासाठी डेव्हलपमेंट प्लॅन तयार केला आहे. या प्लॅननुसार प्रथम गाव हागणदारीमुक्त करून रस्ते, नाल्या बांधण्यात येणार आहे. आठवडी बाजारातील व्यावसायिकांना ओटे तसेच उन्ह, पाण्यापासून संरक्षण साठी बांबूपासून एकसारखे गाळे बांधून देण्यात येणार आहेत. गावातील सर्व घरांना एकसारखा रंग लावण्यात येणार आहे. यातून गावाची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न राहणार आहे. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी गावात वृक्षारोपण केले जाणार आहे. सरपंच, पोलीस पाटील, तसेच नागरिकांना विश्वासात घेतले जाणार असून वन विभाग तसेच जिल्हा परिषदेतील विविध योजनांतून निधी उभारला जाणार आहे.
यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी, वनविभागाचे अधिकारी नरवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, संवर्ग विकास अधिकारी संगीता भांगरे, विस्तार अधिकारी भगत, ग्रामसेवक महाडोळे यांच्या उपस्थितीत गावात बैठक पार पडली. त्यानंतर जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ प्रविण खंडारे, मनुष्यबळ विकास तज्ज्ञ बंडू हिरवे यांनी गावात जावून गावाचा आराखडासुद्धा तयार केला. विशेष म्हणजे, गावात शौचालय तसेच इतर कामेही सुरु करण्यात आली आहेत.