मोबाईल शॉपीत औषध साठा
By Admin | Updated: January 2, 2016 08:37 IST2016-01-02T08:37:12+5:302016-01-02T08:37:12+5:30
मोबाईल शॉपीत औषध साठा ठेवणाऱ्या दोघांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. फराज फारुख शेख (वय २३)

मोबाईल शॉपीत औषध साठा
नागपूर : मोबाईल शॉपीत औषध साठा ठेवणाऱ्या दोघांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. फराज फारुख शेख (वय २३) आणि अयान अहमद इमरान अहमद (वय २२, रा. हबीबनगर) अशी आरोपींची नावे आहेत. टेका नाकाजवळ आरोपींचे रजा मोबाईल स्टोर्स आहे. तेथे आरोपींनी पॅरासिटामॉल सारखी औषधे ठेवली होती. ही माहिती मिळाल्यानंतर शहजाज ताजी खलील ताजी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह दुकानात चौकशी करून ती औषधे जप्त केली. परवाना नसताना औषध खरेदी-विक्री केल्याच्या आरोपावरून फारुख आणि अयानविरुद्ध पाचपावली ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.(प्रतिनिधी)
बड्या व्यापाऱ्यांकडे दुर्लक्ष
अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे. अनेक दुकानदार परवाना नसताना अशा प्रकारची औषधे बाळगून त्याची विक्री करतात. त्यामुळे अशा कारवायांमुळे त्यांच्यावर वचक बसणार आहे. दुसरीकडे शहरात सडकी सुपारी, बनावट सुगंधी जर्दा साठवणारे आणि विकणारे अनेक जण आहेत. एका दिवसात ही मंडळी करोडोंच्या मालाची विक्री करून सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळतात. त्यांच्यावर अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी कारवाई करताना दिसत नाही. दोन आठवड्यांपूर्वी वर्धमाननगरातील एका गोदामात मोठ्या प्रमाणावर सडकी सुपारी आढळली. पोलीस उपायुक्त रंजनकुमार शर्मा यांनी स्वत: या गोदामात धाड घातली. मात्र, कारवाईचा अधिकार अन्न व औषध प्रशासनाला असल्यामुळे हे प्रकरण त्यांच्याकडे सोपविण्यात आले. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांनी बजावलेली भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून, मंत्रालयात त्याची तक्रारही झाल्याची चर्चा आहे.