मोबाईल व व्यसनात फसलेले विद्यार्थी यशस्वी होणे अशक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:23 IST2018-07-22T00:22:17+5:302018-07-22T00:23:23+5:30
प. पू. प्रज्ञायोगी दिगंबर जैनाचार्य श्री गुप्तीनंदीजी गुरुदेव चातुर्मास समिती व श्री पार्श्वप्रभू दिगंबर सैतवाल जैन मंदिर संस्था यांच्यावतीने संगीतमय सिद्धचक्र कथा इतवारीस्थित बाहुबली भवनात सुरू आहे. शनिवारी आचार्यश्री गुप्तीनंदीजी यांनी कथामृतातून मार्गदर्शन केले. मोबाईल आणि व्यसनात फसलेले विद्यार्थी कधी यशस्वी होऊ शकत नाही.

मोबाईल व व्यसनात फसलेले विद्यार्थी यशस्वी होणे अशक्य
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प. पू. प्रज्ञायोगी दिगंबर जैनाचार्य श्री गुप्तीनंदीजी गुरुदेव चातुर्मास समिती व श्री पार्श्वप्रभू दिगंबर सैतवाल जैन मंदिर संस्था यांच्यावतीने संगीतमय सिद्धचक्र कथा इतवारीस्थित बाहुबली भवनात सुरू आहे. शनिवारी आचार्यश्री गुप्तीनंदीजी यांनी कथामृतातून मार्गदर्शन केले. मोबाईल आणि व्यसनात फसलेले विद्यार्थी कधी यशस्वी होऊ शकत नाही. मुलगा वंशाचा दिवा आहे तर मुलगी कुलदीपिका आहे. त्यामुळे मुलगा व मुलीत भेदभाव करू नये. संस्कारशील व आदर्श मुलगी घराची शोभा असते. आजच्या आधुनिकतेच्या काळातही लोक रुढीवादी होत आहेत. मुलाच्या जन्माने पेढे वाटणारी माता पहिली मुलगी झाली तर निराश होते. पिता आणि कुटुंबाची माणसे दु:खी होतात. अनेक कुटुंब असे आहेत, जिथे मुलीच आईवडिलांच्या वृद्धापकाळाचा आधार ठरल्या आहेत. मैना सुंदरीच्या आईवडिलांनी तिच्या इच्छेनुसार आर्यिका श्री यांच्या मार्गदर्शनात लौकिक व अलौकिक अशा सर्व शास्त्राचे ज्ञान दिले. त्याही गुरुच्या आशीर्वादामुळे सर्व शास्त्रात पारंगत झाली. शास्त्रासोबतच शस्त्र चालविणे, घोडसवारी, जलतरण, धनुर्विद्या व तलवारबाजीतही अनेक पुरस्कार प्राप्त केले.
आचार्यश्री यांनी सांगितले, मानव चार आश्रमात विभागला आहे. पहिला विद्यार्थी वा ब्रह्मचर्य आश्रम, दुसरा गृहस्थाश्रम, तिसरा वानप्रस्थ व चौथा संन्यास आश्रम. यात विद्यार्थी आश्रम जीवनाचे पहिले पाऊल आणि महत्त्वाचा टप्पा आहे. यावरच त्याचे भविष्य टिकले असते. ‘काकचेष्टा, बकध्यान, श्वान निद्रा, अल्पाहारी, गृहत्यागी विद्यार्थी’ हे यशस्वी विद्यार्थ्यांचे पाच लक्षण आहेत. असेच विद्यार्थी विद्या प्राप्त करण्यात यशस्वी होत असल्याचा संदेश आचार्यश्री यांनी दिला.
धर्मसभेत सतीश जैन पेंढारी, अनिल जोहरापूरकर, विलास जोहरापूरकर, सुनील जैन पेंढारी, शशिकांत मुधोळकर, शैलेश खेडकर, डॉ. सुरेश जोहरापूरकर, अतुल खेडकर, किरण जोहरापूरकर, कैलाश खेडकर यांनी दीपप्रज्वलन आणि चित्र अनावरण केले. जिनवाणीची स्तुती आर्यिका आस्थाश्री माताजी यांनी केली. मंगलाचरण लाडपुरा महिला मंडळाने केले. गुरुदेव यांचे पादप्रक्षालन व शास्त्रभेट श्री दिगंबर जैन सेनगण मंदिराचे सदस्य व लाडपुरा महिला मंडळाच्या सदस्यांनी केले.
आचार्यश्रींचा दीक्षा दिवस आज
वर्षायोग समितीचे अध्यक्ष दिलीप शिवणकर यांनी आचार्यश्री गुप्तीनंदीजी गुरुदेव यांचा २८ वा मुनी दीक्षा दिवस २२ जुलै रोजी सकाळी ७ वाजता साजरा केला जाणार असल्याची माहिती दिली. इतवारीच्या शहीद चौक भगवान पार्श्वनाथ स्वामी मार्गावर स्थित श्री पार्श्वप्रभू दिगंबर सैतवाल जैन मंदिर संस्थेच्या बाहुबली भवन येथे हा सोहळा साजरा करण्यात येईल. आचार्यश्री गुप्तीनंदी विधान होईल. विधानाचे सौधर्म इंद्र नारायणराव व वर्षा पळसापुरे असतील. दुपारी ३ वाजता संगीतमय सिद्धचक्र कथा होईल. सायंकाळी ७ वाजता गुरुभक्ती, महाआरती व चालिसा होईल. महाआरतीचे सौधर्म इंद्र संतोष, सतीश, सुनील व सूरज जैन पेंढारी कुटुंबीय राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.