विदर्भ समजून घेण्याची ‘मनसे’ परंपरा खंडित
By Admin | Updated: December 7, 2014 00:29 IST2014-12-07T00:29:32+5:302014-12-07T00:29:32+5:30
गत पाच वर्षांत हिवाळी अधिवेशनाच्या दोन दिवसांपूर्वी नागपूरमध्ये दाखल होऊन विदर्भाच्या प्रश्नांची चर्चा करण्याची मनसे आमदारांची परंपरा यंदा मोडली गेली आहे. पक्षाचा एकच आमदार असणे हे यामागचे

विदर्भ समजून घेण्याची ‘मनसे’ परंपरा खंडित
नागपूर : गत पाच वर्षांत हिवाळी अधिवेशनाच्या दोन दिवसांपूर्वी नागपूरमध्ये दाखल होऊन विदर्भाच्या प्रश्नांची चर्चा करण्याची मनसे आमदारांची परंपरा यंदा मोडली गेली आहे. पक्षाचा एकच आमदार असणे हे यामागचे कारण मानले जाते.
नागपूरमध्ये होणाऱ्या अधिवेशनाच्या निमित्ताने या भागातील प्रमुख प्रश्नांची मांडणी विधानसभेत करता यावी म्हणून ते समजून घेण्यासाठी मनसेचे तत्कालीन गट नेते बाळा नांदगावकर व त्यांचे सहकारी आमदार दोन दिवसापूर्वी नागपूरमध्ये दाखल होत असत. पत्रकारांशीही ते संवाद साधत होते. पाच वर्षे ही परंपरा कायम होती. विदर्भातील अनेक प्रश्नही मनसेच्या आमदारांनी विधानसभेत मांडले होते. त्याचा पाठपुरावाही केला होता. २०१४ च्या निवडणुकीत मनसेचे संख्याबळ केवळ एकवर स्थिरावले. ते सदस्यही प्रथमच निवडून आले. त्यामुळे यंदा मनसेला ही परंपरा पुढे चालू ठेवता आली नाही. यासंदर्भात मनसेचे विदर्भ प्रदेश संघटक हेमंत गडकरी म्हणाले की, बाळा नांदगावकर यांना विधिमंडळातील कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव होता. त्यामुळे ते येथे येऊन प्रश्न समजून घेत होते. आता शरद सोनवणे हे मनसेचे एकमेव सदस्य आहेत. त्यांना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी विकासाच्या मुद्यावर सभागृहात प्रश्न मांडण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ते सभागृहात प्रश्न मांडतील. (प्रतिनिधी)
विशाल बरबटे यांचा राजीनामा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष (मध्य, पूर्व आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघ) विशाल बरबटे यांनी त्यांच्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक जबाबदारीमुळे पक्षाला वेळ देऊ शकत नसल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे.