आदर्श गाव दत्तक योजनेकडे आमदारांनी फिरवली पाठ
By Admin | Updated: October 8, 2015 02:37 IST2015-10-08T02:37:00+5:302015-10-08T02:37:00+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही आदर्श गाव दत्तक योजना जाहीर केली आहे.

आदर्श गाव दत्तक योजनेकडे आमदारांनी फिरवली पाठ
नागपूर जिल्ह्यातील वास्तव : तीन आमदारांचाच पुढाकार
आनंद डेकाटे नागपूर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही आदर्श गाव दत्तक योजना जाहीर केली आहे. परंतु मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गृहजिल्हा असलेल्या नागपूर जिल्ह्यातील बहुतांश आमदारांनीच या योजनेकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. नागपुरातील केवळ तीन आमदारांनी आतापर्यंत गाव दत्तक घेतले आहे.
नागपूर शहरात सहा आणि ग्रामीण भागात सहा असे एकूण १२ विधानसभेचे मतदारसंघ आहेत. परंतु यापैकी केवळ दोनच आमदारांनी आतापर्यंत ज्या गावांचा विकास करणार आहेत, त्या गावांची निवड केली असून त्याबाबतचे अधिकृत पत्र जिल्हा नियोजन विभागाकडे सादर केले आहे. आदर्श गाव दत्तक घेण्यात नागपूर जिल्ह्यातून सर्वप्रथम पुढाकार घेतला तो काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी. त्यांनी नरखेड तालुक्यातील थुगावदेव या गावाची निवड केली आहे. थुगावदेवला ते आदर्श गाव करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तर हिंगणा विधानसभा मतदारसंघातील आमदार समीर मेघे यांनी हिंगणा तालुक्यातील अडेगाव या गावाला दत्तक घेतले आहे. तसेच पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले आ. अनिल सोले यांनी सुद्धा भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील रोंगा हे गाव दत्तक घेतले.
नागपूर शहरातील आमदारांना नजीकच्या गावाची निवड करावयाची आहे. परंतु आ. सुधाकर देशमुख (पश्चिम), आ. डॉ. मिलिंद माने (उत्तर), आ. कृष्णा खोपडे (पूर्व), आ. विकास कुंभारे (मध्य) आ. सुधाकर कोहळे (दक्षिण) यांनी अजूनपर्यंत एकाही गावाची निवड केलेली नाही. तसचे ग्रामीण भागातील आमदार सुनील केदार (सावनेर), आ. सुधीर पारवे (उमरेड), आ. मल्लिकार्जुन रेड्डी (रामटेक) यांनीही अजूनपर्यंत एकाही गावाला दत्तक घेतलेले नाही. याशिवाय विधान परिषदेचे सदस्य आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, आ. राजेंद्र मुळक, आ. प्रकाश गजभिये, आ. नागो गाणार यांनीसुद्धा अजूनपर्यंत एकाही गावाला दत्तक घेतलेले नाही.