गँगस्टर सफेलकरशी संबंधित आमदाराची चौकशी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:09 IST2021-04-16T04:09:09+5:302021-04-16T04:09:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - गुन्हेगारीत आकंठ बुडालेला आणि अनेक बेरोजगारांना गुन्हेगारीचे धडे देणारा कुख्यात गुंड रणजित सफेलकर याने ...

गँगस्टर सफेलकरशी संबंधित आमदाराची चौकशी होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - गुन्हेगारीत आकंठ बुडालेला आणि अनेक बेरोजगारांना गुन्हेगारीचे धडे देणारा कुख्यात गुंड रणजित सफेलकर याने शिक्षण क्षेत्रातही घुसखोरी केली होती. विशेष म्हणजे, त्याच्या या शैक्षणिक संस्थांशी संबंधित असलेल्या एका आमदारासह अनेकांची गुन्हे शाखा चौकशी करणार आहे. त्यासाठी आवश्यक ती परवानगी घेतली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. या वृत्तामुळे गुन्हेगारांशी संबंध ठेवून उजळ माथ्याने फिरणाऱ्या अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
गुंडांची मोठी फळी निर्माण करून अनेक राजकीय नेत्यांशी घसट वाढवणाऱ्या सफेलकरने शिक्षण क्षेत्रातही घुसखोरी केली आहे. सफेलकर अध्यक्ष असलेल्या आदिम जाती-जमाती बहुउद्देशीय संस्थेचे कार्याध्यक्ष भाजपचे दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते असल्याची धक्कादायक माहितीही पोलीस तपासात उघड झाली आहे. याशिवाय अन्य काही नावेही पुढे आली आहे. त्यामुळे या सर्वांचेच कनेक्शन पोलीस तपासणार आहेत.
विशेष म्हणजे, तिसरी नापास असलेल्या सफेलकरने अनेकांना धमकावून शिक्षण क्षेत्रातही घुसखोरी केली. त्याच्या आदिम जाती-जमाती बहुउद्देशीय या संस्थेतर्फे पावनगाव येथे ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालय व (स्व.) छाप्रूजी बाविस्कर कनिष्ठ कला महाविद्यालय, भरतवाडा येथे शांती तुलसी इंग्लिश मीडियम स्कूल, भवानी माता उच्च प्राथमिक शाळा आणि संत वियोगी महाराज हिंदी प्राथमिक शाळा सुरू करण्यात आल्या. सुखाशा एज्युकेशन अॅण्ड मल्टिपर्पज सोसायटीतर्फे पुनापूर येथे गुरुकुल इंडियन ऑलम्पियार्ड स्कूल ऑफ स्कॉलर्स तर पब्लिक एज्युकेशन सोसायटीकडून रमानगर येथे राष्ट्रीय हिंदी मराठा प्राथमिक शाळा आणि कामठीत हिंदी व मराठी शाळा चालविल्या जातात, असेही तपासात उघड झाले आहे.
----
संस्थाचालकांचे खुलासे
दरम्यान, क्रूर सफेलकर संस्थेतील पदाधिकारी अथवा कर्मचाऱ्यांना धोका पोहचवू शकतो, याची कल्पना आल्यामुळे त्याला आम्ही संस्थेतून कधीचेच बेदखल केल्याचे खुलासावजा पत्र संस्थाचालकांनी पोलिसांकडे दिले आहे. या वृत्ताला गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनी दुजोरा दिला आहे.
----
आणखी एकाला अटक
विशाल पैसाडेलीची हत्या करून त्याच्या हत्येला अपघात असल्याचा बनाव करण्याच्या गुन्ह्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आणखी एका आरोपीला आज अटक केली. विनय ऊर्फ गोलू द्वारकाप्रसाद बातव (४२) असे त्याचे नाव आहे. मनीष श्रीवास हत्याकांड आणि विशाल पैसाडेलीचे हत्याकांड या दोन्ही गुन्ह्यांत आरोपी विनय बातव वाहनचालक म्हणून सहभागी होता, असे पोलीस तपासात उघड झाले आहे.
----