विधान परिषद आमदार परिणय फुके यांच्या घरातील वाद परत एकदा पोलीस ठाण्यात पोहोचला आहे. त्यांच्या लहान भावाच्या पत्नीने घरात येऊन नातवंडांना भेटायचे असेल तर पैसे द्यावे लागतील, अशी मागणी केली. तसेच सोशल माध्यमांवरून बदनामी करण्याची धमकी दिल्याची तक्रार त्यांच्या आईने केली. या तक्रारीवरून फुके यांच्या लहान भावाच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
फुके यांच्या आई डॉ. रमा रमेश फुके (वय, ६८) यांनी तक्रार दाखल केली आहे. तर प्रिया संकेत फुके यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. प्रियाचे लग्न रमा फुके यांचा लहान मुलगा संकेत यांच्याशी २०१२ मध्ये झाले होते. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. संकेत यांचा २०२२ मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबात वादाची ठिणगी पडली. वादातून प्रियाने घर सोडले व त्या दुसरीकडे राहण्यास सुरुवात केली. रमा यांना नातवंडांची भेट घ्यायची इच्छा व्हायची, मात्र प्रियाने दर महिन्याला अर्धा पेटी पैसे द्यावे लागतील, अशी मागणी केली. ते वेळोवेळी प्रियाला पैसे द्यायचे. मात्र ती कधीही घरी येऊन सामान घेऊन जायची, असा दावा डॉ. रमा यांनी तक्रारीत केला.
६ मे रोजी सायंकाळी प्रियाने विनापरवानगी घरात प्रवेश केला व शिवीगाळ सुरू केली. जर मला पैसे दिले नाहीत, तर नातवंडांना भेटू देणार नाही. तसेच सोशल मीडियावर तुमची बदनामी करेन अशी धमकी दिली. डॉ. रमा यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार केली व पोलिसांनी प्रियाविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, काही महिन्यांअगोदर प्रियाच्या तक्रारीवरून फुके कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाशी माझे काहीही देणे घेणे नसल्याचे आ. परिणय फुके यांनी स्पष्ट केले होते. मी वाद शमविण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र त्यात यश आले नव्हते. हा वाद दूर व्हावा अशीच माझी इच्छा असल्याची भूमिका त्यांनी मांडली होती.
प्रिया फुकेंची सासूविरोधात तक्रारदरम्यान, प्रिया फुकेनेदेखील सासूविरोधात तक्रार केली आहे. ६ मे रोजी सासरे रमेश फुके यांची प्रकृती खराब असल्याने त्यांच्या बोलविण्यावरून मी घरी गेली. एका लग्नाला जायचे असल्याने माझे व मुलांचे कपडे घेण्यासाठी मी माझ्या खोलीत गेली असता तेथील अर्धे सामान गायब होते. सासू रमा फुके यांनी दोन कर्मचाऱ्यांना व्हिडीओ काढायला पाठविले. त्यांनी शिवीगाळ करत एका पोलिस कॉन्स्टेबलला घरी बोलविले. नितीन फुके यांनी त्याला धमकी दिली व मला घराबाहेर काढले नाही तर नोकरीवरून काढेन अशी धमकी दिली. नितीन फुके याच्याविरोधात मी अगोदरदेखील तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी कुठलीही कारवाई केलेली नाही. सासूने माझे स्त्रीधन स्वत:कडे ठेवले आहे. मागील दीड वर्षापासून मला व माझ्या मुलांना माझ्या सासरचे मंडळी वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देऊन मानसिक छळ करीत आहे. तसेच माझ्या मागे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पाठवूनसुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न सातत्याने करीत आहे, अशी तक्रार प्रिया फुकेने केली असून पोलिस आयुक्तांनादेखील पत्र पाठविले आहे.