चुक मान्य<bha>;</bha> मात्र शिकवण सुरूच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:08 IST2021-01-19T04:08:56+5:302021-01-19T04:08:56+5:30
विद्यापीठाची ‘शब्दसाधना’ : तुकडोजी-गाडगेबाबा संबंधातील ‘अनुयायी’ कधी वगळणार? प्रवीण खापरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : चूक मान्य करायची आणि ...

चुक मान्य<bha>;</bha> मात्र शिकवण सुरूच!
विद्यापीठाची ‘शब्दसाधना’ : तुकडोजी-गाडगेबाबा संबंधातील ‘अनुयायी’ कधी वगळणार?
प्रवीण खापरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चूक मान्य करायची आणि दिमाखाने त्याच चुकांची पुनरावृत्ती करायची, असे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वाणिज्य व प्रबंधन विद्याशाखेच्या भाषा अभ्यास मंडळाचे दिसून येते. मंडळाद्वारे संपादित मराठी विषयाच्या पुस्तिकेतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगेबाबांचा संबंध व्यक्त करताना वापरण्यात आलेला ‘अनुयायी’ हा शब्द वगळण्याची हमी दिल्यानंतरही तो संबंध तसाच शिकविला जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
मंडळातर्फे संपादित वाणिज्य प्रथम वर्षाच्या मराठी विषयाच्या ‘शब्दसाधना (भाग १)’ या पुस्तिकेच्या गद्य विभागात अशोक राणा यांनी लिहिलेल्या पाचव्या प्रकरणात तुकडोजी महाराजांना गाडगेबाबांचे अनुयायी संबोधण्यात आले आहे. तुकडोजी महाराज व गाडगेबाबांच्या अभ्यासकांच्या मार्गदर्शनात ‘लोकमत’ने ही चूक मराठी भाषा मंडळाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर जनमाणसाच्या भावनेचा आदर करीत ही चूक दुरुस्त करण्यात येईल, असे लेखी हमीपत्र संपादक मंडळाने दिले होते. त्यानंतर हे प्रकरण शांत होईल आणि विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्याउलट हे प्रकरण तापण्याचीच चिन्हे दिसत आहेत. वाद ओढवून घेतलेला संबंधित पाठ आणि तो शब्द थेट वाक्यासह विद्यार्थ्यांना शिकविला जात असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे, मंडळातर्फे चूक दुरुस्त करण्याची दिलेली हमी हा केवळ दिखावा आहे का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
विद्यापीठाकडून महाविद्यालयांना निर्देश नाहीत
मराठी भाषा अभ्यास मंडळाकडून चूक मान्य करताना दिलगिरी व्यक्त करण्यात आली आणि ‘अनुयायी’ हा शब्द वगळण्याची हमी देण्यात आली होती. मात्र, या हमीसोबतच महाविद्यालयांना शिकवणीतून तो शब्द गाळण्याचे निर्देशही देणे अपेक्षित होते. ऐनवेळी पुस्तके रद्द करणे अशक्य असल्याने, अशा सूचना गरजेच्या होत्या. मात्र, मंडळाने अशी तसदी घेतली नसल्याचे स्पष्ट होत आहे. अशाने विद्यार्थ्यांच्या मनावर खोट्या गोष्टी कोरल्या जाण्याची शक्यता बळावली आहे.
परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी तसेच लिहायचे का?
संबंधित पाठ शिकविताना वर्तमानपत्रात गाजलेली ती चूक शिक्षकांकडून तशीच शिकविली जात आहे. याबाबत विचारले असता विद्यापीठाकडून याबाबतीत कुठल्याही सूचना नसल्याचे शिक्षक सांगत आहेत. विद्यापीठाच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे असेल तर याबाबत आलेल्या प्रश्नाच्या उत्तरात पुस्तकानुरूप वाक्यच लिहावे लागेल, असे शिक्षक सांगत असल्याचे विवेक मुठे या वाणिज्य प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याने ‘लोकमत’ला सांगितले.