Misleading the unemployed in the name of military recruitment | सैन्य भरतीच्या नावाखाली बेरोजगारांची दिशाभूल

सैन्य भरतीच्या नावाखाली बेरोजगारांची दिशाभूल

ठळक मुद्देसोशल मीडियावर बोगस संदेशटीए बटालियनमध्ये भरती असल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील सहा महिन्यापासून सैन्य भरतीच्या नावाखाली बेरोजगार युवकांची दिशाभूल सुरू आहे. फक्त नागपुरातच नव्हे तर देशभरातील सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रकार सुरू आहे. सैन्य भरतीच्या नावाखाली व्हायरल झालेल्या संदेशात टीए बटालियन नागपूरमध्ये भरती होणार असल्याचे म्हटले आहे. संदेशात शैक्षणिक पात्रता व शारीरिक मापदंडाची माहिती व तारीखही देण्यात आल्याने युवकांची दिशाभूल सुरू आहे. यामुळे सेनाधिकारी सतर्क झाले आहेत.
अलिकडेच १८ फेब्रुवारीला असा संदेश सोशल मीडियावरून पुन्हा व्हायरल झाला. यात जीडी (जनरल ड्यूटी) व ट्रेडमन पदााठी २० ते २४ फेब्रुवारीपर्यंत नागपुरात भरती होणार असल्याचे म्हटले आहे. जीडीची २१३ पदे व ट्रेडमनची ६३ पदांच्या या जाहिरातीत शारीरिक पात्रता व आवश्यक दस्तावेजाची माहिती देण्यात आली आहे. जाहिरातीअखेर एका महिलेचे छायाचित्र देण्यात आले असून सुरेखा म. पाटील, नगरसेविका, वॉर्ड क्रमांक २७ असा परिचय देण्यात आला आहे. हा संदेश वाचल्यावर अनेकजण चौकशीसाठी नागपुरात पोहचले. रेल्वे स्टेशनजवळील एआरओ कार्यालयातही चौकशी केली. या खोट्या जाहिरातीमुळे सीताबर्डी किल्ल्यापुढे अनेक उमेदवार जमले होते. या पार्श्वभूमीवर रक्षा मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी ग्रुप कॅप्टन बसंतकुमार पांडे यांनी अशा प्रकारची कोणतीही भरती प्रकिया नसल्याचे स्पष्ट केले आहे. टी ए ची भरती सेना भरती कार्यालयाकडूनच केली जाते. त्याची जाहिरात वर्तमानपत्रांमधून वेळोवेळी दिली जाते. त्यामुळे यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

हा कटकारस्थानाचा भाग तर नव्हे?
बटालियनमधील भरतीचा संदेश वारंवार व्हायरल करण्यामागे हा एखाद्या कटकारस्थानाचा भाग तर नव्हे, अशी शंका उपस्थित केली जात आहे. दोन महिन्यापूर्वी अशाच प्रकारचा एक संदेश सोशल मीडियावरून व्हायरल झाला होता. त्यानंतर देशभरातून शेकडो युवक नागपुरातील एआरओ कार्यालयात पोहचले होते. प्रकार खोटा असल्याचे लक्षात आल्यावर काही युवकांनी गोंधळ घालण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र समजूत घालून सर्वांना परत पाठविण्यात आले होते. आता पुन्हा दुसऱ्यांदा असाच प्रकार घडल्याने शंका उपस्थित होत आहे.

नागपुरात टीए बटालियन नाही
नागपुरात पूर्वी टीए बटालियनचे कार्यालय होते. येथून सैन्यासाठी भरती प्रक्रियाही राबविली जात असे. याची अधिकृत माहिती विविध प्रसार माध्यमातून दिली जात असे. मात्र चार महिन्यांपूर्वी नागपुरातून टीए बटालियन स्थानांतरित झाली आहे. मात्र नागपूरसह देशातील अनेक युवकांना याची कल्पना नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील हा संदेश खरा समजून बेरोजगार युवक भरतीसाठी नागपुरात पोहचत आहेत.

Web Title: Misleading the unemployed in the name of military recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.