नागपुरात आयएएस महिला अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 21:19 IST2019-09-10T21:17:35+5:302019-09-10T21:19:25+5:30
आश्वासनानुसार प्रगती योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे संतप्त झालेल्या यवतमाळ मधील दोघांनी एका महिला आयएएस अधिकाऱ्याच्या कक्षात शिवीगाळ करून गोंधळ घातला.

नागपुरात आयएएस महिला अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आश्वासनानुसार प्रगती योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे संतप्त झालेल्या यवतमाळ मधील दोघांनी एका महिला आयएएस अधिकाऱ्याच्या कक्षात शिवीगाळ करून गोंधळ घातला. सोमवारी दुपारी २.३० च्या सुमारास ही घटना घडली. शिला देवराव भगत आणि सुरेंद्र देवराव भगत (दोघेही रा. जवाहरनगर, यवतमाळ) अशी आरोपींची नावे आहेत.
भाग्यश्री भीमरावजी बानायत (वय ४०) या आयएएस अधिकारी असून, रेशीम संचालनालयात सेवारत आहेत. सोमवारी त्या आपल्या कार्यालयात बसून असताना तेथे आरोपी शिला भगत आणि सुरेंद्र भगत आले. त्यांनी बानायत यांच्या कक्षात शिरण्याचा प्रयत्न केला. समोर बसलेले शिपायी ढोणे यांनी विरोध केला असता त्यांना धक्काबुक्की करून बानायत यांच्या कक्षात आले. तेथे आमच्या हक्काचा लाभ आम्हाला देण्यास का टाळाटाळ करता, अशी विचारणा करीत गोंधळ घातला. बानायत यांना शिवीगाळ करून आरडाओरड केली. या प्रकारामुळे तेथे गोंधळ निर्माण झाला. बाजूचे कर्मचारी धावले त्यांनी आरोपींना आवरले. बानायत यांनी सदर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपावरून शिला आणि सुरेंद्र भगतविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांनाही ताब्यात घेतले.