अल्पवयीनांना ‘५० सीसी’चाच परवाना
By Admin | Updated: August 12, 2016 02:38 IST2016-08-12T02:38:14+5:302016-08-12T02:38:14+5:30
अल्पवयीन मुलामुलींना ‘५० सीसी’च्याच गाड्या चालविण्यासाठी परवाना देण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी घेतला आहे.

अल्पवयीनांना ‘५० सीसी’चाच परवाना
हायकोर्टात माहिती : आरटीओचे परिपत्रक
नागपूर : अल्पवयीन मुलामुलींना ‘५० सीसी’च्याच गाड्या चालविण्यासाठी परवाना देण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी घेतला आहे. यासंदर्भात परिपत्रकही जारी करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य सरकारी वकील भारती डांगरे यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.
यासंदर्भात न्यायालयाने स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने वरील माहिती लक्षात घेता पुढील मुद्दे विचारात घेण्यासाठी दोन आठवड्यांनंतर सुनावणी निश्चित केली. मोटरसायकल चालविताना एका अल्पवयीन मुलाच्या हातून अपघात झाला होता. यामुळे अंबाझरी पोलिसांनी संबंधित मुलाविरुद्ध एफआयआर नोंदविला आहे. अल्पवयीन मुलाविरुद्ध एफआयआर नोंदविता येत नाही, असा दावा करून उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल करण्यात आली होती. (प्रतिनिधी)