तंबाखूच्या कारवाईत लाखोंचा गोलमाल करणाऱ्यांची भंबेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:07 IST2021-07-17T04:07:59+5:302021-07-17T04:07:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - प्रतिबंधित सुगंधित तंबाखू भरलेले वाहन सोडून देणाऱ्या लकडगंज पोलिसांच्या संशयास्पद कारवाईचे वृत्त लोकमतने शुक्रवारी ...

Millions of people involved in tobacco smuggling | तंबाखूच्या कारवाईत लाखोंचा गोलमाल करणाऱ्यांची भंबेरी

तंबाखूच्या कारवाईत लाखोंचा गोलमाल करणाऱ्यांची भंबेरी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - प्रतिबंधित सुगंधित तंबाखू भरलेले वाहन सोडून देणाऱ्या लकडगंज पोलिसांच्या संशयास्पद कारवाईचे वृत्त लोकमतने शुक्रवारी ठळकपणे प्रकाशित करताच संबंधित पोलिसांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली आहे. प्रकरण उघड झाल्याने कारवाईचे बालंट येऊ शकते, हे ध्यानात आल्याने लकडगंज पोलिसांनी बचावासाठी धावपळ सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर, खोटी माहिती देऊन वरिष्ठांची दिशाभूल करण्याचा पवित्रा घेतला जाण्याची शक्यता संबंधित सूत्रांनी वर्तविली आहे.

लकडगंजमध्ये स्मॉल फॅक्टरी एरियात बुधवारी दुपारी लाखोंचा प्रतिबंधित सुगंधी तंबाखू, गुटखा आणि तत्सम पदार्थ असलेले वाहन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे लकडगंजचे पोलीस कारवाईसाठी स्मॉल फॅक्टरी एरियात दुपारी घुटमळत होते. वाहन नजरेस पडताच पोलिसांच्या पथकाने ते थांबवले. वाहनचालकाची चाैकशी केली. विशेष म्हणजे, पोलिसांनी कारवाईचा पवित्रा घेतला असतानाच काय झाले कळायला माग नाही. ‘साहेबांचा फोन आला’ असे म्हणत पोलीस पथकाने कारवाई थांबवली. ‘कोणत्या साहेबांचा फोन होता, ते कळायला मार्ग नाही. मात्र, ‘आदेश मिळाल्यामुळे’ कारवाईसाठी गेलेले पोलीस पथक हात हलवत परतले. त्यांनी हे वाहन पोलीस ठाण्यात आणण्याचीही तसदी घेतली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, त्या वाहनात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, गुटखा अन् तत्सम पदार्थांचा सुमारे ५० ते ६० लाखांचा माल भरून होता. हे वाहन पोलीस ठाण्यात चाैकशीसाठी का आणण्यात आले नाही, वाहन रिकामे असल्याचा दावा पोलीस कोणत्या आधारे करीत आहेत, ते सुद्धा कळायला मार्ग नाही. मोठ्या कारवाईसाठी धडकताच खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडीओ तयार करतात. या कारवाईचा व्हिडीओ पोलिसांनी बनविला की नाही, ते सुद्धा स्पष्ट झाले नाही. त्याचमुळे वाहन रिकामे असल्याची बतावणी करण्यासाठी लाखोंची डील झाल्याची उलटसुलट चर्चा आहे. ‘लोकमत’ने संबंधित वृत्त प्रकाशित करताच शुक्रवारी दिवसभरात लकडगंजमधील संबंधित पोलिसांच्या अनेक ‘चिंतन बैठका’ झाल्या. कारवाईचे बालंट टाळण्यासाठी वरिष्ठांना काय सांगायचे, त्याचीही स्क्रीप्ट बनविण्यात आल्याची संबंधित सूत्रांची माहिती आहे.

---

पोलीस आयुक्तांच्या आदेशाला खो

शहरातील अवैध धंदे गुन्हेगारी वाढण्यास कारणीभूत असल्याचे ध्यानात घेऊन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील सर्व ठाणेदारांना आपल्या क्षेत्रातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहे. कोणत्याही तोडपाण्यात अडकू नका, गैरप्रकार करू नका, असेही कडक शब्दात सांगितले आहे. मात्र, लकडगंजमध्ये पोलीस आयुक्तांचा आदेश धुडकावून लावण्यात आला आहे. या भागात रोज लाखोंच्या धान्याची काळाबाजारी तसेच सडकी सुपारी, सुगंधित तंबाखूपासून गुटख्यापर्यंतच्या प्रतिबंधित चीजवस्तूंची बिनबोभाट तस्करी सुरू आहे.

----

Web Title: Millions of people involved in tobacco smuggling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.