नागपुरात मायलेकाला घरात घुसून मारहाण, हल्लेखोर फरार
By Admin | Updated: October 31, 2016 15:19 IST2016-10-31T15:19:29+5:302016-10-31T15:19:29+5:30
ऐन दिवाळीच्या दिवशी पाच जणांनी मिळून मायलेकावर घरात घुसून मारहाण केल्याची घटना घडली आहे.

नागपुरात मायलेकाला घरात घुसून मारहाण, हल्लेखोर फरार
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 31 - ऐन दिवाळीच्या दिवशी पाच जणांनी मिळून मायलेकावर घरात घुसून मारहाण केल्याची घटना घडली आहे. कोतवालीतील गवळीपुरा परिसरातील रविवारी मध्यरात्रीची ही घटना आहे. या हल्ल्यात वीणा भेंडे आणि त्यांचा मुलगा अमर भेंडे जखमी झाले आहेत. हल्ला करणा-या पाच जणांनी मिळून अमर भेंडे या 24 वर्षांच्या तरुणाला चाकूने भोसकले तर त्याच्या आईला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. अमर आपल्या आईसोबत चित्रा टॉकीजजवळच्या पहेलवान चाळीत राहतो. रविवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास कामावरुन घरी परत येत असताना त्याचे आजम रुस्तम पहेलवान आणि वसिम अक्रम शेख या दोघांसोबत क्षुल्लक कारणावरुन वाद झाला.
याचा राग मनात ठेवून रुस्तम, वसिम, नजिम अक्रम शेख, शरीफ शेरू आणि अशफाक यांनी मिळवून अमरला त्याच्या घरात घुसून मारहाण केली. या पाच जणांनी चाकू आणि लाकडी दांड्याने मारुन अमरला जखमी केले, यावेळी अमरचा आरडाओरडा ऐकून मदतीसाठी धावलेल्या त्याच्या आईलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.
यानंतरही हे पाचही जण फरार झाले आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे निर्माण झाले आहे. वीणा भेंडे यांच्या तक्रारीवरुन पोलीस स्टेशनमध्ये पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्यापपर्यंत एकालाही अटक करण्यात आलेली नाही.