‘एमआयएल’ला मिळाला ३९ कोटींचा महसूल
By Admin | Updated: July 27, 2015 03:31 IST2015-07-27T03:31:45+5:302015-07-27T03:31:45+5:30
डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दीड वर्षात १२०० हून अधिक खासगी विमाने उतरली. या काळात

‘एमआयएल’ला मिळाला ३९ कोटींचा महसूल
नागपूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दीड वर्षात १२०० हून अधिक खासगी विमाने उतरली. या काळात ‘एमआयएल’ला (मिहान इंडिया लिमिटेड) ३९.५० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. आश्चर्याची बाब म्हणजे यातील सव्वासात कोटीहून अधिक रुपये केवळ विजेचे देयक भरण्यात गेले आहेत. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी १ जानेवारी २०१४ ते ३० जून २०१५ या कालावधीत ‘एमआयएल’ला प्राप्त झालेला महसूल, उतरलेल्या विमानांची संख्या, विजेचे देयक तसेच प्राण्यांमुळे झालेले अपघात याबाबतीत विचारणा केली होती. ‘एमआयएल’कडून मिळालेल्या माहितीनुसार या कालावधीत एकूण ३९ कोटी ५८ लाख ९४ हजार ९७९ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. यातील सर्वाधिक २२ कोटी रुपयांचा महसूल हा ‘पीएसएफ’अंतर्गत (पॅसेंजर सर्व्हिस चार्जेस) प्राप्त झाला आहे. या दीड वर्षांच्या कालावधीत विमानतळावर १२५८ खासगी विमाने उतरली व त्यांच्यापासून १ कोटी ५८ हजार ८८८ रुपयांचा महसूल मिळाला. दरम्यान या कालावधीत ‘एमआयएल’ने विजेच्या देयकांपोटी ७ कोटी २९ लाख ८७ हजार ८५७ रुपये खर्च केले.
एका विमानाकडून महसूलच नाही
दीड वर्षांच्या कालावधीत ‘कॉन्टिनेन्टल एव्हिएशन प्रा.लि.’चे विमान विमानतळाच्या कार्यान्वित असलेल्या भागात ‘पार्क’ आहे. या कालावधीत या कंपनीकडून कुठल्याही प्रकारचा महसूल प्राप्त झालेला नाही. हा महसूल मिळण्याची शक्यता फारच कमी असल्याचे ‘एमआयएल’तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.