राष्ट्रीय ग्राहक आयोगात म्हाडाचा अर्ज खारीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 21:48 IST2019-07-16T21:47:10+5:302019-07-16T21:48:00+5:30
महेश जैन व इतर ग्राहकांच्या तक्रारीमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व नागपूर महापालिका यांना प्रतिवादी करण्यासाठी म्हाडाने नवी दिल्ली येथील राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात दाखल केलेला अर्ज खारीज झाला. त्यामुळे म्हाडाला जोरदार धक्का बसला.

राष्ट्रीय ग्राहक आयोगात म्हाडाचा अर्ज खारीज
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महेश जैन व इतर ग्राहकांच्या तक्रारीमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व नागपूर महापालिका यांना प्रतिवादी करण्यासाठी म्हाडाने नवी दिल्ली येथील राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात दाखल केलेला अर्ज खारीज झाला. त्यामुळे म्हाडाला जोरदार धक्का बसला.
तक्रारकर्त्या ग्राहकांनी प्रत्येकी ४५ लाख रुपयामध्ये सुभाष रोडवरील म्हाडा सिटी प्रकल्पातील फ्लॅटस् खरेदी केले आहेत. म्हाडाने ३२० ग्राहकांकडून १२८ कोटी रुपये घेतले आहेत. १५ डिसेंबर २०१२ पर्यंत फ्लॅटस्चा ताबा देण्याची ग्वाही देण्यात आली होती. परंतु, ती ग्वाही अद्याप पाळण्यात आली नाही. या योजनेचे कंत्राट आयव्हीआरसीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे आहे. या कंपनीला प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ३० जून २०१३, ३१ डिसेंबर २०१३, ३० एप्रिल २०१४ व ३१ नोव्हेंबर २०१४ अशी चारदा मुदतवाढ देण्यात आली. परंतु, कंपनीने अद्याप प्रकल्प पूर्ण केला नाही. तसेच, म्हाडाला प्रकल्प पूर्णत्वाचे प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र, पर्यावरण मंजुरी, अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक मान्यताही मिळालेल्या नाहीत. त्यामुळे ग्राहकांनी राष्ट्रीय ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली आहे. ग्राहकांच्या वतीने अॅड. तुषार मंडलेकर यांनी बाजू मांडली.