पुरुष नसबंदीकडे वाढतोय कल : लाभार्थ्याला मिळतात १४५० रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 22:06 IST2019-02-21T22:05:06+5:302019-02-21T22:06:46+5:30
आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय पुरुष नसबंदी (एनएसव्ही) प्रशिक्षण व शस्त्रक्रियेला सुरुवात झाली आहे. शिबिरात गेल्या दोन आठवड्यात ४३ पुरुषांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेष म्हणजे, दोन मिनिटांची ही शस्त्रक्रिया बिनटाक्याची आहे. शस्त्रक्रियेनंतर लगेच घरी जाता येते. राज्य शासनाकडून लाभार्थ्यास ११०० रुपये तर केंद्र शासनाकडून ३५० असे एकूण १४५० रुपये लाभार्थ्यास प्रोत्साहनपर दिले जात असल्याने नसबंदीकडे पुरुषांचा कल वाढत असल्याचे चित्र आहे.

पुरुष नसबंदीकडे वाढतोय कल : लाभार्थ्याला मिळतात १४५० रुपये
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय पुरुष नसबंदी (एनएसव्ही) प्रशिक्षण व शस्त्रक्रियेला सुरुवात झाली आहे. शिबिरात गेल्या दोन आठवड्यात ४३ पुरुषांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेष म्हणजे, दोन मिनिटांची ही शस्त्रक्रिया बिनटाक्याची आहे. शस्त्रक्रियेनंतर लगेच घरी जाता येते. राज्य शासनाकडून लाभार्थ्यास ११०० रुपये तर केंद्र शासनाकडून ३५० असे एकूण १४५० रुपये लाभार्थ्यास प्रोत्साहनपर दिले जात असल्याने नसबंदीकडे पुरुषांचा कल वाढत असल्याचे चित्र आहे.
कन्हान येथे आयोजित ‘एनएसव्ही’ शिबिरात नरखेडचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्यानंद गायकवाड यांनी नुकतीच आठ पुरुष रुग्णांवर नसबंदी शस्त्रक्रिया केली. दरम्यान, डॉ. गायकवाड यांनी भिवापूरचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण राऊत व सिर्सीचे डॉ. स्वप्निल डडमल यांना शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण दिले. १८ फेबु्रवारी रोजी रामटेक तालुक्यातील मनसर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये १८ पुरुषांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. रामटेकचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन नाईकवार, डॉ. संदीप धरमठोक, मनसरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम चौधरी आदींसह आरोग्यसेवक व कर्मचाऱ्यांनी शिबिराच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले. २० फेबु्रवारी रोजी कुही तालुक्यातील तितूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. डॉ. गायकवाड यांनी २५ पुरुषांवर नसबंदी शस्त्रक्रिया केली. यावेळी कुही तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय निकम व तितूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गिलानी उपस्थित होते. आज २१ फेबु्रवारी रोजी मकरधोकडा व २७ फेबु्रवारी रोजी रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात हे शिबिर होणार आहे.