साडेतीनशे पोलिसांकडून जेलची झाडाझडती; सव्वाचार तास मोहिमेत अवघा ५ ग्राम गांजा हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2022 12:12 PM2022-09-08T12:12:50+5:302022-09-08T12:18:48+5:30
मोबाइल्ससाठी नागपूर कारागृहात ‘मेगा सर्च ऑपरेशन’; मोबाइल तर नाही; पण ५ ग्रॅम गांजा आढळला
नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहात मोबाइलच्या बॅटरी व गांजा आत जात असल्याचे प्रकरण पोलिसांनी गंभीरतेने घेतले आहे. कारागृहात काही कैदी मोबाइल वापरत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी पहाटे ‘मेगा सर्च ऑपरेशन’ राबविले. अधिकारी व कर्मचारी मिळून साडेतीनशेजण या कारवाईत सहभागी झाले होते.
सव्वातास चाललेल्या शोधमोहिमेदरम्यान पोलिसांना एकही मोबाइल आढळला नाही. मात्र एका कैद्याकडे पाच ग्रॅम गांजा सापडला. दरम्यान, हे प्रकरण ताजे असतानाच कारागृहाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची पुण्याला बदली करण्यात आली आहे.
कैद्याकडून गांजा, मोबाइल बॅटरी तुरुंगात नेण्याचा प्रयत्न; झडतीत कारागृह रक्षकांनी पकडले
खापरखेडा येथे राहणारा सूरज कावळे (वय २२) हा गुन्हेगार न्यायालयातून कारागृहात परत जात असताना त्याच्याजवळील फाईलमध्ये ५१ ग्रॅम गांजा व १५ मोबाइल बॅटरी सापडल्या होत्या. यानंतर पोलिसांनी गांजा पुरविणाऱ्या मोरेश्वर सोनावणे याच्यासह अथर्व खटाखटी, मुकेश नायडू, शुभम कावळे, भागीरथ थारदयाल, सूरज वाघमारे यांना अटक केली. याशिवाय कारागृहात असलेला निलंबित पोलीस उपनिरीक्षक प्रदीप नितवणे याने हे पैसे दिल्याची बाब समोर आली होती.
मोबाईल्ससाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात पोलिसांचं सर्वात मोठं ‘सर्च ऑपरेशन’
या प्रकरणात प्राथमिक चौकशीदरम्यान कारागृहात काही कैद्यांकडून मोबाइलचा वापर होत असल्याची माहिती समोर आली. मंगळवारी रात्री कारागृह प्रशासनाच्या महानिरीक्षकांना विश्वासात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ॲक्शन प्लॅन तयार केला. सकाळी सहा वाजता साडेतीनशे पोलीस कारागृहात पोहोचले. पुरुष कैद्यांची प्रत्येक बॅरेक तपासण्यात आली. सव्वादहा वाजेपर्यंत कारवाई सुरू होती. पोलिसांना यावेळी एका कैद्याकडे पाच ग्रॅम गांजा सापडला.
कारागृहाचे ‘मोबाईल कनेक्शन’ उघड; 'त्या' पीएसआयनेच बोलविल्या बॅटरीज्, दोन कर्मचारी निलंबित
डिटेक्टरने मोबाइलचा शोध
नागपूर कारागृहात पहिल्यांदाच इतकी मोठी शोधमोहीम राबविण्यात आली. यात गुन्हे शाखा, झोन-२ यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबविली. सोबतच बीडीडीएसचे पथकदेखील होते. त्यांच्याकडे मेटल डिटेक्टर, एनएसजेडी डिटेक्टर यासारखी यंत्रदेखील होती.
कैद्यांना अगोदरच मिळाली होती माहिती
कारागृहात येताना मोबाइल बॅटरी व गांजा जप्त झाल्याची माहिती कैद्यांना मिळाली होती. त्यामुळे ते सावध झाले होते. काहीजण नियमित मोबाइल वापरत असल्याची निश्चित माहिती पोलिसांना मिळाली होती; परंतु कैद्यांना मंगळवारचादेखील दिवस भेटला व या कालावधीत मोबाइल्सची विल्हेवाट लावण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पीएसआयच्या पोलीस भावालादेखील अटक
या प्रकरणात पोलिसांना आतापर्यंत आठजणांना अटक केली आहे. निलंबित पीएसआयचा भाऊ सचिन नितवणे हा नागपूर पोलिसात कार्यरत असून, त्याने पैसे ट्रान्सफर केले होते. त्यालादेखील अटक करण्यात आली असून, या प्रकरणात आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. अतिरिक्त महासंचालक (कारागृह) यांनी पुण्यावरून विशेष पथकदेखील पाठविले असून, त्यांच्याकडून देखील शोध घेण्यात येणार आहे.
दोषींवर 'मोक्का’ लावण्याची तयारी
कारागृहातील मोबाइल रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. अटक करण्यात आलेला सूरज कावळे हा यापूर्वीच मोक्काचा आरोपी आहे. जुन्या प्रकरणात किंवा नव्याने कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या रॅकेटमध्ये जो कुणी सहभागी असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.