मूल्यांकनानुसार मेडिकलला मिळणार ‘स्टार’
By Admin | Updated: October 25, 2016 02:56 IST2016-10-25T02:56:40+5:302016-10-25T02:56:40+5:30
आरोग्य सेवेसाठी असलेल्या राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये (मेडिकल) कौशल्यपूर्ण

मूल्यांकनानुसार मेडिकलला मिळणार ‘स्टार’
राज्यभरातील रुग्णालयांसाठी ‘स्टार मार्किंग’ पद्धत
सुमेध वाघमारे ल्ल नागपूर
आरोग्य सेवेसाठी असलेल्या राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये (मेडिकल) कौशल्यपूर्ण डॉक्टर घडत आहेत का?, खरंच रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते काय? हा प्रश्न आज सर्वांपुढेच निर्माण झाला आहे. शासनालाही या प्रश्नाचे उत्तर हवे आहे. म्हणूनच राज्यभरातील १६ मेडिकलसाठी ‘स्टार मार्किंग’ पद्धती अमलात आणण्यात आली आहे. याला नुकतीच मंजुरी मिळाली असून या महिन्यापासून सुरुवातही झाली आहे. गेल्या वर्षीच्या कामगिरीवर ‘स्टार’ दिले जाणार आहे. यामुळे ‘फाईव्ह स्टार’ मिळविणारे मेडिकल कुठले राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काही खासगी इस्पितळातील लूट आणि मनपा किंवा शासकीय रुग्णालयात नेल्यास रु ग्ण जीवानिशी जाण्याची भीती या कात्रीत आज गरीब व मध्यमवर्गीय सापडले आहेत. वैद्यकीय शिक्षणाबाबतही फारसे चांगले चित्र नाही.
मेडिकलमध्ये गुणात्मक बदल होण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे (डीएमईआर) सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे यांनी ‘स्टार मार्किंग’चा प्रस्ताव सादर केला. याला वरिष्ठांनी तत्काळ मंजुरी देत लागू करण्याचे निर्देशही दिले. या पद्धतीत रुग्णालयाच्या कामगिरीनुसार मूल्यांकन करून पाचपर्यंत चिन्हांकित स्टार दिले जाणार आहेत. यासंदर्भातील माहितीचे पत्र राज्याच्या सर्व मेडिकलमध्ये धडकले असून जास्तीत जास्त स्टार मिळविण्याच्या प्रयत्नांना सुरुवात झाली आहे.