मेडिकलमध्ये संशोधन : प्लाझ्मा थेरपीने गाठला पहिला टप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 21:52 IST2020-06-06T21:50:44+5:302020-06-06T21:52:19+5:30
कोविडमधून बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाशी लढू शकणाऱ्या अँटीबॉडीज मुबलक असतात. त्या काढून कोरोनाशी लढणाऱ्या एखाद्या रुग्णाच्या शरीरात सोडल्यास रुग्णाचे शरीर कोरोनाशी चांगल्या पद्धतीने लढते. म्हणून कोरोना विषाणूला हरवून जी व्यक्ती बरी झाली आहे, त्या व्यक्तीचा रक्तातील प्लाझ्मा कोरोनाबाधित रुग्णाला दिला जातो. याला ‘प्लाझ्मा थेरपी’ म्हटले जाते. मेडिकलमध्ये यावर संशोधन सुरू आहे. शनिवारी संशोधनातील पहिला टप्पा ओलांडला.

मेडिकलमध्ये संशोधन : प्लाझ्मा थेरपीने गाठला पहिला टप्पा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविडमधून बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाशी लढू शकणाऱ्या अँटीबॉडीज मुबलक असतात. त्या काढून कोरोनाशी लढणाऱ्या एखाद्या रुग्णाच्या शरीरात सोडल्यास रुग्णाचे शरीर कोरोनाशी चांगल्या पद्धतीने लढते. म्हणून कोरोना विषाणूला हरवून जी व्यक्ती बरी झाली आहे, त्या व्यक्तीचा रक्तातील प्लाझ्मा कोरोनाबाधित रुग्णाला दिला जातो. याला ‘प्लाझ्मा थेरपी’ म्हटले जाते. मेडिकलमध्ये यावर संशोधन सुरू आहे. शनिवारी संशोधनातील पहिला टप्पा ओलांडला. कोविड बरा झालेल्या एका रुग्णाने आपले प्लाझ्मा दान केले. आता लवकरच मध्यम गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णाला ते उपलब्ध करून दिले जाईल. ‘कोविड-१९’चा रुग्णाच्या उपचारात ‘प्लाझ्मा थेरपी’ने एक नवीन आशा निर्माण केली आहे. या थेरपीवर संशोधन करण्यासाठी देशातील नागपूरच्या मेडिकलसह १११ वैद्यकीय महाविद्यालयांनी ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’कडे (आयसीएमआर) परवानगी मागितली होती. यात २१ महाविद्यालयांना मंजुरी मिळाली. यात महाराष्ट्रातील केवळ पाच महाविद्यालये असून नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) समावेश आहे. कोविडचा बरा झालेला रुग्ण कोरोनाची लागण झालेल्या दुसऱ्या रुग्णाला बरेकरू शकतो, हे समोर आले. परंतु प्लाझ्मा थेरपी किती यशस्वी ठरू शकते, याबद्दल अजून ठोस पुरावे नाहीत. मेडिकलमध्येही प्लाझ्मा थेरपीवर संशोधन सुरू आहे. ‘प्लाझ्मा थेरपी ट्रायल’ प्रकल्पाचे प्रिन्सीपल इन्व्हेस्टीगेटर श्वसनरोग विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम आहेत तर को-इन्व्हेस्टीगेटर म्हणून मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गोसावी व रक्तपेढीचे प्रमुख डॉ. संजय पराते आहेत. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या मार्गदर्शनात हे संशोधन होत आहे. ‘लोकमत’शी बोलताना डॉ. गोसावी म्हणाले, शनिवारी पहिल्यांदा कोविड पॉझिटिव्ह असलेला व बरे होऊन २८ दिवस झालेला, परंतु कोणतेही लक्षणे नसलेल्या कोरोनामुक्त रुग्णाने रक्तदान केले. एका खासगी रक्तपेढीत त्याने हे रक्तदान केले. त्यांच्या रक्तातून प्लाझ्मा वेगळा केला जाईल आणि नंतर मध्यम गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णाला तो दिला जाईल. सध्यातरी मेडिकलमध्ये असे लक्षणे असलेला रुग्ण नाही. यामुळे प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दोन गटांवर होईल संशोधन
आयसीएमआर’ मार्गदर्शक तत्त्वानुसार देशात २२६ मध्यम गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांचा एक गट राहील. त्यांच्यावर जनरल औषधांचा उपचार केला जाईल, तर दुसऱ्या २२६ मध्यम गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांच्या गटाला ‘प्लाझ्मा थेरपी’ देऊन दोघांचा अभ्यास केला जाणार आहे. मेडिकलमध्ये सहा-सहा रुग्णांचे दोन गट तयार केले जाणार असल्याची माहिती आहे.