डॉ. मेश्राम यांच्या सत्कारासाठी एकवटल्या वैद्यकीय संघटना
By सुमेध वाघमार | Updated: February 15, 2024 20:16 IST2024-02-15T20:16:39+5:302024-02-15T20:16:59+5:30
३०वर संघटनांचा समावेश : पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याने डॉक्टरांमध्ये उत्साह.

डॉ. मेश्राम यांच्या सत्कारासाठी एकवटल्या वैद्यकीय संघटना
नागपूर : नागपुरातील ख्यातनाम न्यूरोलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांना पद्मश्री पुरस्कार जाहिर करण्यात आला. त्या निमित्ताने त्यांच्या सत्कारासाठी ३०वर वैद्यकीय संघटना एकवटल्या. १८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता उत्तर अंबाझरी मार्गावरील आयएमए सभागृहात हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती, अकॅडमी आॅफ मेडिकल सायन्सचे अध्यक्ष डॉ. अजय अंबाडे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.
या प्रसंगी अकॅडमीच्या सचिव डॉ. अनुराधा रिधोरकर, ‘आयएमए’च्या अध्यक्ष डॉ. वंदना काटे, सचिव डॉ. कमलाकर पवार, सत्कार समितीचे संयोजक डॉ. रमेश मुंडले, सहसंयोजक डॉ. राजु खंडेलवाल व डॉ. प्रमोद गिरी उपस्थित होते. डॉ. गिरी म्हणाले, वर्ल्ड फेडरेशन आॅफ न्यूरोलॉजी या १२३ देशांचे सदस्य असलेल्या ट्रॉपिकल न्यूरोलॉजी विभागाचे डॉ. मेश्राम हे २०१७ पासून अध्यक्ष आणि २०२२ पासून संघटनेचे विश्वस्त म्हणून निवडले गेले आहे. ही उपलब्धी मिळविणारे ते पहिले भारतीय डॉक्टर आहेत. डॉ. मेश्राम यांच्या कर्तृत्व आणि कौशल्याचा ठसा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. डॉ. खंडेलवाल म्हणाले, डॉ. मेश्राम यांनी ‘ब्रेन विक’ सुरू करून जनसामान्यामध्ये मेंदूशी संबंधित आजार व त्यावरील उपाययोजनांची जनजागृती करीत आहे. समाजासाठी हे एक मोठे योगदान आहे. डॉ. मुंडले म्हणाले, हा सत्कार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या उपस्थित होणार आहे. पत्रपरिषदेला डॉ. अलंकार रामटेके, डॉ. मंजुषा गिरी, डॉ. संजय देवतळे आदी उपस्थित होते.
-या संघटनांचा असणार समावेश
सत्कार सोहळ्याचे आयोजन अकॅडेमी आॅफ मेडिकल सायंसेस व इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर द्वारा आयोजित करण्यात आला आहे. यात आॅथोर्पेडिक सोसायटी, न्युरो सोसायटी, सोसायटी आॅफ अॅनेस्थेशियॉलॉजिस्टस्, सायकियाट्रिक सोसायटी, डायबेटिक असोसिएशन आॅफ इंडिया, असोसिएशन आॅफ फिजिशियन्स, आॅब्स्टेस्ट्रिक्स अॅन्ड गायनिकॉलॉजिकल सोसायटी, रेडियोलॉजिकल असोसिएशन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेल्थ आॅर्गनायझेशन, असोसिएशन आॅफ पॅथॉलॉजिस्टस् अॅन्ड मायक्रोबॉयलॉजिस्टस्, सोसायटी आॅफ क्रिटीकल केअर मेडिसिन, असोसिएशन आॅफ मेडिकल फॅकल्टीज्, आॅफ्थेल्मॉलॉजिकल सोसायटी, विदर्भ आफ्थेंल्मीक सोसायटी, अकॅडेमी आॅफ पेडियाट्रिक्स, असोसिएशन आॅफ रीप्रॉडक्टिव्ह अॅन्ड चाईल्ड हेल्थ, असोसिएशन आॅफ आॅटोलॅरींगॉलॉजिस्टस्, सोसायटी आॅफ कार्डीयोथोरॅसिक अॅनेस्थेसियॉलॉजिस्टस्, असोसिएशन आॅफ मेडिकल वुमेन्स, सोसायटी फॉर स्टडी आॅफ पेन, मेनोपॉज सोसायटी, नेफ्रोलॉजी सोसायटी, जीएमसी व आयजीएमएसी अॅल्सुमनी असोसिएशन, असोसिएशन आॅफ सर्जन्स, युरॉलॉजीकल सोसायटी, विदर्भ हॉस्पिटल असोसिएशन, विदर्भ चेस्ट असोसिएशन आदींचा सहभाग असणार आहे.