वैद्यकीय निष्काळजीपणाची याचिका फेटाळली
By Admin | Updated: July 1, 2014 00:52 IST2014-07-01T00:52:20+5:302014-07-01T00:52:20+5:30
खामला येथील एका प्रसिद्ध खासगी रुग्णालयात २१ एप्रिल २०१२ रोजी परासिया (छिंदवाडा) येथील महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. यासंदर्भात दाखल फौजदारी रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या

वैद्यकीय निष्काळजीपणाची याचिका फेटाळली
हायकोर्ट : वैद्यकीय मंडळाने नाकारले आरोप
नागपूर : खामला येथील एका प्रसिद्ध खासगी रुग्णालयात २१ एप्रिल २०१२ रोजी परासिया (छिंदवाडा) येथील महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. यासंदर्भात दाखल फौजदारी रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वैद्यकीय मंडळाचा अहवाल तपासल्यानंतर फेटाळून लावली आहे.
नंदेशकुमार पहाडे असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. त्यांची आई दुखवतीबाईचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याचा आरोप लावून याप्रकरणाची गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) चौकशी करण्यात यावी व रुग्णालयाने पाच लाख रुपये भरपाई द्यावी, अशी याचिकाकर्त्याची विनंती होती. न्यायालयाने ११ डिसेंबर २०१३ रोजी मृत्यूच्या कारणाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, वैद्यकीय मंडळाने गेल्या २९ जानेवारी रोजी अहवाल सादर करून उपचारादरम्यान वैद्यकीय निष्काळीपणा झाल्याच्या आरोपाचे खंडन केले.
ही बाब लक्षात घेता न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. न्हाणीघरात पडल्यामुळे दुखवतीबाईच्या हाताचे हाड तुटले होते. त्यांना २० एप्रिल २०१२ रोजी सकाळी ८ वाजता शस्त्रक्रिया विभागात नेण्यात आले. काही वेळानंतर त्यांना शस्त्रक्रिया न करताच बाहेर आणले. तेव्हा त्या मृत्यू झाल्याप्रमाणे निपचित पडल्या होत्या. परंतु, डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता त्यांना मृत घोषित केले.
यामुळे पहाडे यांनी तत्काळ धंतोली पोलिसांकडे तक्रार नोंदवली. रुग्णालय व्यवस्थापन मृत्यूमागचे खरे कारण लपवत आहे, असा पहाडे यांचा आरोप होता. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. राहुल कुरेकार, तर शासनातर्फे एपीपी संजय डोईफोडे यांनी कामकाज पाहिले. (प्रतिनिधी)