मेडिकलच्या इंटर्नला मारहाण : अधिष्ठात्यांचे चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 23:42 IST2019-08-23T23:41:38+5:302019-08-23T23:42:27+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) इंटर्नवर (आंतरवासी) मारहाण झाल्याची घटना सामोर येताच खळबळ उडाली. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

मेडिकलच्या इंटर्नला मारहाण : अधिष्ठात्यांचे चौकशीचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) इंटर्नवर (आंतरवासी) मारहाण झाल्याची घटना सामोर येताच खळबळ उडाली. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. परंतु मारहाण झालेल्या घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात किंवा महाविद्यालय प्रशासनाकडे करण्यास इंटर्न तयार नाही. यामुळे या प्रकरणाकडे संशयाने पाहिले जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रशिक्षणार्थी डॉक्टर असलेल्या इंटर्न हा मंगळवारी रात्री बालरोग विभागाच्या अतिदक्षता विभागातून आपले काम संपवून ‘ओपीडी’ समोर ठेवलेल्या वाहनाकडे जात होता. याच वेळी एका अज्ञात इसमाने त्याला नेत्ररोग विभागाकडे एक रुग्ण पडून असल्याचे सांगून घेऊन गेला. तिथे आधीच एका व्यक्तीने इंटर्नच्या मानेवर चाकू लावला. त्याला ई-लायब्ररीच्या मागील भागात घेऊन गेले. तिथे आणखी दोन अनोळखी इसम होते. त्यांनी इंटर्नला मारहाण करून त्यांच्याकडील तीन हजार रुपये हिसकावले. हातावर ब्लेडने वार केल्याचेही सांगण्यात येते. घाबरलेल्या इंटर्नने रुग्णालयात मलमपट्टी करून वसतिगृह गाठले. ही माहिती इतरांना कळताच खळबळ उडाली. याची माहिती अजनी पोलिसांना देण्यात आली. परंतु तक्रार नसल्याने त्यांना पुढे काही करता आले नाही. याची गंभीर दखल घेत अधिष्ठाता डॉ. मित्रा यांनी चौकशी समिती स्थापन केली. समितीच्या अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ही घटना घडत असताना सुरक्षा रक्षक कुठे होते, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.