नागपूर : ‘एमबीबीएस’ अभ्यासक्रमाच्या ‘बायोकेमिस्ट्री-भाग २’चा पेपर जो बुधवारी होता तो लता मंगेशकर कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर सोमवारीच उघडल्याने खळबळ उडाली. आरोग्य विज्ञान विद्यापीठाने तातडीने याची दखल घेत राज्यातील सर्व केंद्रांवर बुुधवारी या विषयाची नवीन प्रश्नपत्रिका दिली. या घटनेची विद्यापीठामार्फत चौकशी होणार असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी- २०२३ सत्राच्या लेखी परीक्षा २८ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर २०२३ कालावधीत घेण्यात येत आहेत. राज्यभरातील ५० परीक्षा केंद्रांवर या परीक्षा सुरू आहेत. ६ नोव्हेंबरला लता मंगेशकर कॉलेजमध्ये ‘एमबीबीएस-२०१९’च्या अभ्यासक्रमाच्या ‘बायोकेमिस्ट्री भाग-१’ विषयाऐवजी ‘बायोकेमिस्ट्री भाग-२’ विषयाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. ‘बायोकेमिस्ट्री-भाग २’ विषयाची परीक्षा ८ नोव्हेंबरला होणार होती. अचानक पेपर बदलल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला.
अनावधानाने झालेली चूक कॉलेजने विद्यापीठाच्या लक्षात आणून दिली. विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, तातडीने उपाययोजना करीत राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर ‘बायोकेमिस्ट्री भाग-२’ विषयाचा पेपर बदलवून दुसरी प्रश्नपत्रिका विद्यापीठामार्फत पुरविण्यात आली. प्रश्नपत्रिका बदलल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा प्रसंग टळला. परीक्षा प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ नयेत, तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाकडून तत्परतेने ही कार्यवाही केली.