नागपूर : राज्यातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून यंदा कट-ऑफ मोठ्या प्रमाणात खाली आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गाचा कट-ऑफ यंदा ५०९ गुणांवर आला आहे. गेल्या वर्षी तो ६४२ गुणांपर्यंत गेला होता. तर खासगी वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेशासाठी यंदा कट-ऑफ ४७९ गुणांवर आला आहे.
राज्यातील ६४ वैद्यकीय महाविद्यालयांच्या ८,१३८ जागांसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. यंदा शासकीय तसेच खासगी महाविद्यालयांच्या कट-ऑफमध्ये घट झाली आहे. करोना काळानंतर नीट परीक्षेचा अवघडपणा कमी ठेवण्यात आला होता; मात्र यंदा तो पूर्वीसारखाच ठेवण्यात आला. प्रश्नपत्रिकेत एकाच प्रश्नाच्या पर्यायांमध्ये साम्य असल्याने विद्यार्थ्यांना प्रश्न सोडवण्यासाठी अधिक वेळ लागला. त्यामुळे कट-ऑफ कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी आधीच वर्तवली होती. विशेषतः भौतिकीचा पेपर कठीण वाटल्याची विद्यार्थ्यांची भावना होती.
कट-ऑफ घसरल्याचा थेट परिणाम डेंटल, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी आणि फिजिओथेरपी अभ्यासक्रमांवरही होणार आहे. गेल्या वर्षी बीएएमएसच्या शासकीय महाविद्यालयांत प्रवेशासाठी ५०० गुण आवश्यक होते; मात्र यंदा हा कट-ऑफ आणखी कमी होईल, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
बीटेकची तिसरी मेरिट यादी २१ लाअभियांत्रिकी पदवी (बीई/बीटेक) प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी दोन फेऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून, एकूण ६४ हजार ८४१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तिसऱ्या फेरीची मेरिट यादी २१ ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे. दुसऱ्या फेरीत १ लाख ८३ हजार ७६० जागांसाठी १ लाख ८९ हजार २७७ विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम भरले होते. त्यापैकी १ लाख ६२ हजार २०५ विद्यार्थ्यांना प्रवेश अलाॅट करण्यात आला. तरीही २१,५५५ जागा रिक्त राहिल्या आहेत. पहिल्या फेरीत ३४,931 आणि दुसऱ्या फेरीत २९,९१० असे मिळून आतापर्यंत ६४,८४१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अजूनही १ लाख १८ हजार ९१९ जागा रिक्त आहेत.