मेयोच्या एमबीबीएसच्या २०० जागा अडचणीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:11 IST2021-08-21T04:11:47+5:302021-08-21T04:11:47+5:30

नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) एमबीबीएसच्या १५० जागांसाठी ७७ कोटी रुपये खर्चून प्रशासकीय इमारतीचे ...

Mayo's 200 MBBS seats in trouble! | मेयोच्या एमबीबीएसच्या २०० जागा अडचणीत!

मेयोच्या एमबीबीएसच्या २०० जागा अडचणीत!

नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) एमबीबीएसच्या १५० जागांसाठी ७७ कोटी रुपये खर्चून प्रशासकीय इमारतीचे बांधकाम हाती घेण्यात आले. परंतु दोन वर्षांपूर्वी वाढलेल्या एमबीबीएसच्या ५० जागांमुळे या इमारतीची उंची कमी पडली. ‘एनएमसी’च्या निकषाप्रमाणे २०० जागांसाठी या इमारतीमध्ये आणखी एक मजला वाढविण्यावर मेयो प्रशासनाने अखेर शुक्रवारी निर्णय घेतला.

मेयोतील एमबीबीएसच्या १५० जागेच्या तुलनेत पायाभूत सोयींची कमतरता व अल्प मनुष्यबळावर बोट ठेवत भारतीय वैद्यक परिषद (एमसीआय) दरवर्षी त्रुटी काढत होती. यामुळे मागील आठ वर्षांत मेयोमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम झाले. यात बहुउद्देशीय इमारत, नवा आकस्मिक विभाग, मुला-मुलींचे वसतिगृह, ‘सर्जिकल कॉम्प्लेक्स’ची इमारत उभी झाली. तीन वर्षांपूर्वी प्रशासकीय इमारतीच्या बांधकामालाही सुरुवात झाली. याच दरम्यान २०१९ मध्ये महाराष्ट्रात खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षण लागू करण्यासाठी केंद्र सरकारने एमबीबीएसच्या जागा वाढवण्याला मान्यता दिली. केंद्र सरकारने देशभरात एमबीबीएसच्या ४४६५ जागा वाढवल्या. महाराष्ट्रात सर्वाधिक ९७० जागा वाढल्या. याचा फायदा मेयोलाही झाला. एमबीबीएसच्या २०० जागा झाल्या. या वाढीव जागेमुळे प्रशासकीय इमारतीची जागा कमी पडली. पूर्वीचे ‘एमसीआय’ व आताचे राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी) त्रुटी काढण्याची शक्यता होती. यामुळे प्रशासकीय इमारतीचा आणखी एक मजला वाढविण्याचा प्रस्तावावर आज निर्णय घेण्यात आला.

-प्रशासकीय इमारतीत असणार हे विभाग

मेयोच्या प्रशासकीय इमारतीतून अधिष्ठाता कार्यालयाचे कामकाज चालणार आहे. सोबतच मायक्रोलॉजी, पॅथाॅलॉजी, फार्माकोलॉजी व न्याय वैद्यकशास्त्र विभागाचा प्रयोगशाळांचा समावेश असणार आहे. पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ई-लायब्ररी असणार आहे. सहा लेक्चर्स हॉल असणार आहे. सोबतच कॅन्टीनसाठी स्वतंत्र जागा व तळमजल्यावर पार्किंगची सोय असणार आहे.

-‘एनएमसी’चे निकष पूर्ण करण्यासाठी एक मजला वाढविणार

एमबीबीएसच्या १५० जागेला घेऊन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम हाती घेण्यात आले होते. परंतु दरम्यानच्या काळात या जागा वाढून २०० झाल्या. ‘एनएमसी’चे निकष पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय इमारतीचा आणखी एक मजला वाढविण्यावर आज बैठक झाली. लवकरच या संदर्भातील प्रस्ताव तयार करून तो वरिष्ठांकडे पाठविला जाईल.

- डॉ. भावना सोनवणे, अधिष्ठाता, मेयो

Web Title: Mayo's 200 MBBS seats in trouble!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.