अंगाची लाही करणारा मे यंदा तापलाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:08 IST2021-05-23T04:08:44+5:302021-05-23T04:08:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एरवी मे महिना म्हणजे कडक उन्हाचा! अंगाची लाही लाही करणारा! पण या वर्षी मे ...

अंगाची लाही करणारा मे यंदा तापलाच नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एरवी मे महिना म्हणजे कडक उन्हाचा! अंगाची लाही लाही करणारा! पण या वर्षी मे महिन्याचा दुसरा पंधरवडा उलटला तरी तापमानाचा पारा सामान्य स्तरावरच असून ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे सरकलेला नाही. या महिन्याच्या पुढील दिवसातही नागरिकांना वाढलेल्या तापमानाचा फारसा सामना करावा लागणार नाही, असा अंदाज आहे. १५ मे ते २२ मे या काळात पारा फक्त दोन वेळाच ४० अंश सेल्सिअसवर गेल्याची नोंद आहे.
पर्यावरण अभ्यासकांच्या मते, दुसरा पंधरवडा सुरू झाल्यावर अरबी समुद्रात चक्रीवादळ उठले. त्याचा परिणाम महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान तसेच मध्य भारतामधील अवकाशात पडला. त्याचा परिणाम आता संपत नाही तोच, पूर्व-मध्य बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे २३ ते २४ मे दरम्यान बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळ होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम मध्य भारतातील हवामानावर पडण्याची शक्यता आहे. यामुळेच मे महिन्याच्या उर्वरित दिवसात कडक उन्ह आणि उष्णतामान जाणवणार नाही, असा अंदाज आहे. मराठवाडा व परिसरात तसेच देशाच्या अन्य भागातही चक्रीवादळाचा परिणाम पडलेला जाणवत आहे. मान्सूनपूर्व हालचालही वाढल्याने त्याचाही परिणाम दिसणार आहे. एकंदर, मे महिन्यात कडक उष्णतेची शक्यता कमी आहे. विशेष म्हणजे, नवतपाच्या प्रारंभाला पारा सामान्य तापमानाच्या खाली राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
...
ढगाळलेले राहणार, पावसाचाही अंदाज
२३ ते २८ मे या काळात नागपुरातील किमान तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत असेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. अवकाशात ढग दाटलेले राहतील. २७ मे रोजी गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
...
मे महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यातील तापमान
दिनांक - कमाल - किमान
१५ मे - ३९.५ - २५.६
१६ मे - ३९.० - २८.२
१७ मे - ३७.० - २६.२
१८ मे - ४०.२ - २९.२
१९ मे - ३५.६ - २३.६
२० मे - ३६.१ - २५.३
२१ मे - ३९.० - २३.०
२२ मे - ४०.९ - २४.२
...