नागपूर : चित्रपटाचे दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्ड यांच्यातील वाद हा जुना आहे. सिनेमा, राजकारण, समाजकारण, संस्कृती, इतिहास आदी विविध विषयातील तज्ञ आणि परिपक्व माणसे ही सेन्सॉर बोर्डवर असतील तर हे वाद टाळता येऊ शकतात, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी येथे व्यक्त केले. अमृत भवन येथे आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. सध्या सेन्सॉर बोर्डबाबत सुरू असलेला वाद आणि त्यात काही राजकीय हस्तक्षेप आहे का, यासंदर्भात त्यांना विचारणा केली असता त्यांनी यावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. परंतु त्यांनी सांगितले की, सेन्सॉर बोर्डवर पाच व्यक्ती असतात. कुठलाही चित्रपट पाहण्यापूर्वी संबंधित चित्रपटाच्या दिग्दर्शकालाही बोलावून घेतले जाते. तेव्हा चित्रपटाबाबत काही आक्षेप असतील तर ते तेव्हाच बोलून दूर होतात. मात्र चित्रपटातील काही दृश्य हटवायचे असेल, तेव्हा वाद होतात परंतु ते टाळता येऊ शकतात. कुठलेही दृश्य न कापताही चित्रपटाला प्रमाणपत्र देता येते. एखादा चित्रपट १८ वर्षाखालील मुलांनी पाहू नये, असे वाटत असेल तर त्या चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट देता येते. असेच सर्व चित्रपटाबाबत करता येऊ शकते. हा वाद टाळण्यासाठी पुढे असेच करावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी स्वत:च्या ‘मुक्ता’ या चित्रपटाचे उदाहरण दिले. मुक्ता चित्रपटामध्ये विविध जातीच्या संदर्भातील संभाषण होते. तेव्हा सेन्सॉर हा चित्रपट पास करेल का असा अनेकांना संशय होता. चित्रपट सुरू होण्यापूर्वी मी तसे जाहीरपणे स्पष्ट केले होते की, या चित्रपटात विविध जातीसंबंधीचा उल्लेख आलेला आहे. परंतु तो कुठल्याही जाती धर्माला कमी लेखण्यासाठी करण्यात आलेला नाही. सेन्सॉर बोर्डाने कुठलीही कात्री न लावता तो पास केला होता, असेही जब्बार पटेल यांनी आवर्जून सांगितले.
वाद टाळण्यासाठी सेन्सॉर बोर्डवर हवीत परिपक्व माणसे
By admin | Updated: June 20, 2016 02:48 IST