‘मामा’ च्या हत्याकांडातील सूत्रधार अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 22:12 IST2019-07-31T22:10:55+5:302019-07-31T22:12:55+5:30
१५ हजार रुपयांसाठी झालेल्या वादातून रविवारी रात्री गुंडांनी २५ वर्षीय आनंद शिरपूरकर याची हत्या केली होती. या घटनेनंतर कोतवाली पोलिसांनी समीर शेंडे, यश गोस्वामी, प्रफुल्ल शिवरेकर व प्रदीप काळे यांना अटक केली होती. सोमवारी रात्री हत्येचा सूत्रधार रितेश शिवरेकर यालाही अटक करण्यात आली. पोलिसांनी बुधवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मृत ‘मामा’ आनंद शिरपूरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १५ हजार रुपयांसाठी झालेल्या वादातून रविवारी रात्री गुंडांनी २५ वर्षीय आनंद शिरपूरकर याची हत्या केली होती. या घटनेनंतर कोतवाली पोलिसांनी समीर शेंडे, यश गोस्वामी, प्रफुल्ल शिवरेकर व प्रदीप काळे यांना अटक केली होती. सोमवारी रात्री हत्येचा सूत्रधार रितेश शिवरेकर यालाही अटक करण्यात आली. पोलिसांनी बुधवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मृत आनंदचे रितेश शिवरेकर याच्यावर ८ हजार रुपये होते तर रितेशचे वस्तीतील मनोज मेहर याच्यावर १५ हजार रुपये होते. त्यासाठी रितेश मनोजसोबत वाद घालत होता. त्यामुळे आनंदने रितेशला ८ हजार रुपये कापून मनोजकडून ७ हजार रुपये घेण्यास सांगितले. त्यामुळे रितेश संतप्त झाला. त्याने चर्चेसाठी आनंदला बोलावून मित्राच्या मदतीने त्याची हत्या केली.
आनंद मूळचा उमरेड येथील रहिवासी होता. त्याची आई व बहीण उमरेडमध्ये राहते. आठ वर्षापूर्वी तो गुजरवाडी येथे आला होता. टाईल्स विक्रीचा व्यवसाय करीत होता. त्याचा स्वभाव मनमिळावू होता. अनेकांना तो आर्थिक मदतही करीत होता. गुजरवाडीतील सर्व लोक त्याला ‘मामा’ म्हणायचे. वस्तीतील सर्वांचाच तो मामा होता. वस्तीतील कुठल्याही कार्यक्रमात तो सक्रिय असायचा. वस्तीतील कुणालाही मदतीची गरज भासल्यास ते आनंदकडेच यायचे. त्याच्या स्वभावामुळे नेहमीच त्याच्या घरी, लोकांचा गोतावळा रहायचा. वस्तीच्या लोकांचे म्हणणे आहे की, आनंदबद्दल प्रत्येकाला आदर होता. आनंदने फक्त वाद निपटावा म्हणून रितेशला म्हटले होते. मदतीच्या भावनेतून आनंदला आपला जीव गमवावा लागला. वस्तीच्या लोकांनी आनंदची हत्या केलेल्या आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
आनंदवर असलेल्या प्रेमापोटी गुजरवाडी मित्र मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक दु:खी आहे. त्यांनी होर्डींग, बॅनर लावून आनंदला श्रद्धांजली दिली आहे.
रितेशच्या बहिणीला अटक करण्याची मागणी
गुरजवाडीच्या लोकांनी या हत्याकांडासाठी रितेशच्या बहिणीला दोषी ठरविले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, हल्ल्यातून रितेशच्या हातातून चाकू सुटल्यामुळे आनंद जीव वाचवून तेथून पळाला. तो मंगेश निनावे याच्या घरात लपून बसला होता. रितेशच्या बहिणीने आनंद लपून बसल्याचे सांगितले. त्यामुळे रितेशने घरात शिरून परत आनंदवर हल्ला केला. वस्तीच्या लोकांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून रितेशच्या बहिणीला अटक करण्याची मागणी केली आहे.