नागपुरातील गजबजलेल्या बजाजनगरात झाडावर आढळला मसन्या उद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 00:38 IST2020-01-29T00:36:24+5:302020-01-29T00:38:51+5:30
बजाजनगर पोलीस स्टेशनलगतच्या छात्रावासाच्या परिसरात झाडावर लटकून असलेल्या मसन्या उद या प्राण्याला मंगळवारी दुपारी रेस्क्यू ऑपरेशन राबवून पकडण्यात आले.

नागपुरातील गजबजलेल्या बजाजनगरात झाडावर आढळला मसन्या उद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बजाजनगर पोलीस स्टेशनलगतच्या छात्रावासाच्या परिसरात झाडावर लटकून असलेल्या मसन्या उद या प्राण्याला मंगळवारी दुपारी रेस्क्यू ऑपरेशन राबवून पकडण्यात आले. त्याला सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहे. एरवी वन्य क्षेत्रात आढळणारा हा प्राणी बजाजनगरसारख्या गजबजलेल्या वस्तीमध्ये आढळल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
मंगळवारी सकाळी छात्रावासामध्ये असलेल्या झाडावर असलेल्या एका अनोळखी प्राण्याचे ओरडणे ऐकून परिसरातील नागरिक गोळा झाले. हा प्राणी अनोळखी वाटल्याने अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. बरीच गर्दी जमली. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. यासंदर्भात वनविभागाला माहिती देण्यासाठी वन परिक्षेत्र अधिकारी विजय गंगावणे यांच्याशी पोलिसांनी संपर्क साधला. आरएफओ गंगावणे यांनी रेस्क्यू टीमचे फॉरेस्टर के. एम. जामगडे यांना माहिती दिली. त्यानंतर वनरक्षक बोरकर, एन. एल. मुसळे, रवी मिटकरी, आशिष महल्ले, चेतन बारसकर, बंडू मेश्राम यांचे पथक घटनास्थळी पोहचले. झाडावर चढून या कर्मचाऱ्यांनी मसन्या उदला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पुन्हा पुढे जात होता. अखेर ५० फूट उंचीवरून खाली उतरविण्यात यश आले.
या प्राण्याला सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करून नंतर खापाच्याजंगलात सोडले जाणार आहे.
चार घुबडांना उपचारानंतर सोडले
मकरसंक्रांतीला मांजात फसून जखमी झालेल्या चार घुबडांना मंगळवारी सायंकाळी अंबाझरी जंगलात सोडण्यात आले. मागील १२ दिवसांपासून त्यांच्यावर ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती सुधारल्यावर त्यांना खुले करण्यात आले.