लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांना घेऊन शासन गंभीर नसल्याने व ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) विधेयकाच्या विरोधात सोमवार २ एप्रिल रोजी निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ आंदोलन करून लक्ष वेधणार आहे. याला ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) पाठिंबा दिला आहे.‘सेंट्रल मार्ड’ने २५ मार्च रोजी दिल्लीत ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) विधेयकाविरोधात डॉक्टरांनी महापंचायतीचे आयोजन केले होते. या बैठकीत संप पुकारण्यासंदर्भात सर्व डॉक्टरांचे एकमत झाले होते. या महापंचायतीला देशभरातील २५ हजार डॉक्टर, कनिष्ठ डॉक्टर्स, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थीही उपस्थित होते. ‘एनएमसी’ विधेयक गरिबांच्या विरोधात आहे. या विधेयकातील काही मुद्यांमुळे वैद्यकीय व्यवसायात भ्रष्टाचार वाढेल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील वैद्यकीय व्यवसायाचे नुकसान होत आहे. नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकातील काही मुद्दे डॉक्टरांच्या विरोधात आहेत. संसदीय समितीने दिलेला रिपोर्ट मान्य करायचा का नाही, याचा अधिकार सरकारकडे आहे. त्यामुळे २ एप्रिलपासून सर्व डॉक्टर, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी बेमुदत संपावर जाण्याची शक्यता होती. परंतु २७ मार्चला हे विधेयक पुन्हा संसदेत चर्चेसाठी येऊन काही त्रुटींवर सकारात्मक चर्चा झाल्याने संप मागे घेण्यात आल्याचे बोलले जाते. आता संपाऐवजी आंदोलन करण्याचे ठरले असून नागपुरातील ‘मार्ड’ संघटना सोमवारी दोन तास विविध पद्धतीने आंदोलन करणार आहे. ‘आयएमए’ नागपूर शाखेने याला पाठिंबा दिला आहे, अशी माहिती आयएमएच्या अध्यक्ष डॉ. वैशाली खंडाईत व सचिव डॉ. प्रशांत राठी यांनी दिली.
नागपुरात ‘एनएमसी’ विरोधात ‘मार्ड’चे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:22 IST
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांना घेऊन शासन गंभीर नसल्याने व ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) विधेयकाच्या विरोधात सोमवार २ एप्रिल रोजी निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ आंदोलन करून लक्ष वेधणार आहे. याला ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) पाठिंबा दिला आहे.
नागपुरात ‘एनएमसी’ विरोधात ‘मार्ड’चे आंदोलन
ठळक मुद्देसोमवारी वेधणार लक्ष : ‘आयएमए’चा पाठिंबा