दिल्लीच्या राजकारणात मराठी माणूस टिकत नाही

By Admin | Updated: May 31, 2014 01:03 IST2014-05-31T01:03:53+5:302014-05-31T01:03:53+5:30

सामान्यत: दिल्लीच्या राजकारणात अंतर्गत काय सुरू आहे. ते देशात फारसे कळत नाही. निर्णय आणि आरोप - प्रत्यारोपांच्या बाबतीत बातम्या वाहिन्यांवर आणि माध्यमात येतात.

Marathis do not survive in the politics of Delhi | दिल्लीच्या राजकारणात मराठी माणूस टिकत नाही

दिल्लीच्या राजकारणात मराठी माणूस टिकत नाही

राम खांडेकर : माजी पंतप्रधान नरसिंहराव यांच्या मुख्य सचिवांशी संवाद
नागपूर : सामान्यत: दिल्लीच्या राजकारणात अंतर्गत काय सुरू आहे. ते देशात फारसे कळत नाही.  निर्णय आणि आरोप - प्रत्यारोपांच्या बाबतीत बातम्या वाहिन्यांवर आणि माध्यमात येतात. पण  अंतर्गत बरेच काही शिजत असते. या सार्‍या राजकारणात टिकून राहणे मराठी माणसांसाठी  अतिशय कठीण आहे. राज्यातले राजकारण आणि देशाचे राजकारण यात बरेच अंतर आहे. त्यात  विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना आणि विरोधी पक्षाला विश्‍वासात घेऊन काम करणे कुठल्याही  पंतप्रधानांसाठी एक आव्हानच असते, असे मत देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचे  मुख्य सचिव राम खांडेकर यांनी व्यक्त केले.
वनराईच्यावतीने डॉ. गिरीश गांधी यांनी राम खांडेकर यांच्या आठवणींबाबत एक संवाद निवडक  लोकांसाठी आयोजित केला होता. याप्रसंगी नरसिंहराव यांचे व्यक्तिमत्त्व उलगडून दाखविताना  त्यांनी नरसिंहराव यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. नेत्यांना बरेचदा अनेक बाबी कळत  नाही. जनभावनेच्या आग्रहाला मोठमोठे नेते बळी पडतात आणि त्यांना नंतर त्याची किंमतही  मोजावी लागते. लातूरला भूकंप झाल्यावर नरसिंहराव यांना अनेकांनी त्वरित लातूरला भेट देण्याची  विनंती केली होती. या भूकंपाने ते पंतप्रधान म्हणून व्यथितही झाले होते. जनभावना पाहता त्यांनी  त्वरित लातूरला जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मी त्यांच्या जवळ होतो. पंतप्रधान म्हणून त्यांनी  भूकंप झाल्याबरोबर तेथे जाऊ नये, अशी सूचना मी त्यांना केली. कारण पंतप्रधान घटनास्थळी  जाणार म्हटल्यावर रस्ते बंद करण्यात येणार, काम थांबविले जाणार. त्यामुळे नागरिकांचा जीव  वाचविण्याच्या कार्यात अडथळा निर्माण होणार. भूमिका आणि भावना चांगली असली तरी काही  वेळेला त्वरित न जाणे योग्य असते. तेथील मृतदेह पाहायला जाऊन काहीच हाती लागत नाही.  एखादी घटना घडल्यावर तेथील लोकांचे अश्रू पुसायला पंतप्रधानांनी गेले पाहिजे. त्यामुळेच घटना  घडल्यावर तीन दिवसांनी जाण्याचा सल्ला मी त्यांना दिला आणि त्यांनी तो लगेच मानला.  चंदीगडला एका शिबिराच्या तंबूला आग लागली आणि त्यात २५0 विद्यार्थी होरपळून गेले.  त्यावेळीही मी त्यांना दोन दिवसांनी जाण्याची सूचना केली होती. त्यामुळेच एखादा अधिकारी  सारासार विवेकबुद्धीने विचार करणारा असला तर नेत्याला तो योग्य सूचना करू शकतो. यात मी  माझे काम केले पण निर्णय त्यांचाच होता.
पण नरसिंहराव यांच्यासारख्या मोठय़ा नेत्याने त्यावर विचार केला, ही मोठी बाब आहे. नरसिंहराव  यांच्या फार जवळ कुणी नव्हते पण शंकरराव चव्हाण, यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांनी  त्यांना साथ दिली. राजकीय नेते प्रचंड महत्वाकांक्षी असतात. त्यामुळे या नेत्यांचे संबंध एकमेकांशी  चांगले असले तरी राजकीय महत्वाकांक्षेपायी मतभेद होत राहतात. प्रत्येकवेळी हे मतभेद  राजकारणाच्या पलिकडे सामान्य माणसांना कळत नाहीत. कळू शकत नाहीत. पण सर्वोच्च पदावर  आरुढ असलेल्या नेत्याला हे सारेच रुसवे-फुगवे सहन करावे लागतात. राज्यसभेवर जाण्यासाठी  प्रत्येकाचे वेगवेगळे ठोकताळे असतात. या सार्‍या लॉबिंगमध्ये योग्य निर्णय घेणे, फार कठीण  होऊन बसते. पण नरसिंहराव यांनी मोठय़ा कौशल्याने माणसे सांभाळलीत. केवळ नरसिंहराव होते  म्हणूनच काँग्रेसचे सरकार पाच वर्षे सत्तेत राहू शकले. माणसे सांभाळण्याची त्यांची हातोटी  वादातीतच म्हणावी लागेल. माझ्याशी नेहमीच त्यांचा संवाद मराठीत व्हायचा. पंतप्रधान  असतानाही त्यांचे वाचनातले सातत्या मला नेहमीच खुणावायचे. विमान प्रवास करताना ते नेहमी  तीन पुस्तके ठेवायचे. एका पुस्तकाची काही पाने वाचली की दुसरे पुस्तक हाती घ्यायचे. विशेष  म्हणजे सरकार चालविताना त्यांनी पक्षाकडे लक्ष दिले नाही. सरकार आणि पक्ष एकाच वेळी  चालविले तर कुणालाच न्याय देता येत नाही, असे त्यांचे मत होते. पंतप्रधान असताना त्यांच्यावर  काही आरोप झाले असले तरी कुठल्याही अनियमिततेत आणि भ्रष्टाचाराला ते बळी पडले नाहीत,  हे मी जवळून पहिले, असे खांडेकर म्हणाले. याप्रसंगी गिरीश गांधी म्हणाले, शरद पवार यांनी  त्यावेळी माझे नाव राज्यसभेसाठी सुचविले होते. शरद पवारांनी नाव सुचविले म्हणजे मी  राज्यसभेवर जाणार, अशीच सर्वांंंंची भूमिका झाली. पण शरद पवार मला म्हणाले, नरसिंहराव  यांनी तुमच्या नावावर शिक्कामोर्तब केले तरच तुम्ही राज्यसभेवर जाऊ शकता. माझ्याकडून मी  नाव सुचविले आहे. त्यावेळी नरसिंहराव यांना कसे भेटावे? हा प्रश्न माझ्यासमोर पडला. पण  त्यानंतर राज्यसभेची जागाच रिक्त झाली नाही, त्यामुळे माझे राज्यसभेवर जाणे हुकले. याप्रसंगी  खांडेकर यांनी विविध प्रश्नांना मोकळी उत्तरे दिली. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजीत,  बाळ कुळकर्णी, गजानन निमदेव, रमेश बोरकुटे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
 

Web Title: Marathis do not survive in the politics of Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.