जागतिक स्तरावर मराठीची गगनभरारी आवश्यक ! महिला साहित्य संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By गणेश हुड | Updated: April 26, 2025 17:27 IST2025-04-26T17:27:14+5:302025-04-26T17:27:47+5:30

डॉ. प्रज्ञा आपटे : ‘आम्ही सिद्ध लेखिका’च्या तिसऱ्या राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनात उत्स्फूर्त प्रतिसाद

Marathi needs to skyrocket globally! Spontaneous response to Mahila Sahitya Sammelan | जागतिक स्तरावर मराठीची गगनभरारी आवश्यक ! महिला साहित्य संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Marathi needs to skyrocket globally! Spontaneous response to Mahila Sahitya Sammelan

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
दोन हजार वर्षांपासून अस्तित्वात असलेली आणि यादव व शिवशाही काळात राजभाषेचा दर्जा लाभलेली मराठी भाषा आता अभिजात भाषेच्या गौरवाने सन्मानित झाली आहे. मराठीने आता जागतिक स्तरावर पोहचले पाहिजे, असे मत सुप्रसिद्ध लेखिका आणि समीक्षक डॉ. प्रज्ञा आपटे यांनी व्यक्त केले. ‘आम्ही सिद्ध लेखिका’ संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी अमृत भवन येथे आयोजित तिसऱ्या राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या.

या संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध लेखिका व कादंबरीकार शुभांगी भडभडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. संस्थेच्या अध्यक्षा प्रा. पद्मा हुशिंग, विश्वस्त व स्वागताध्यक्षा उषा चांदूरकर, विदर्भ प्रमुख कविता कठाणे, ॲड. प्रार्थना सदावर्ते, अस्मिता चौधरी, पद्मा हुशिंग, वृषाली राजे, ज्योत्स्ना चांदगुडे, शुभांगी गान, देविका देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. प्रज्ञा आपटे म्हणाल्या, साहित्याच्या माध्यमातून आजची तरुण पिढी समाजातील विविध व्यथा, वेदना प्रभावीपणे मांडत आहे. साहित्याचा प्राणतत्त्व म्हणजे मनुष्यता आहे. शुभांगी भडभडे यांनी अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, हा दर्जा मराठीच्या सांस्कृतिक वारशाला आणि कलासंपन्नतेला मिळालेली मान्यता आहे. संस्थेच्या अध्यक्षा प्रा. पद्मा हुशिंग म्हणाल्या, ‘लिहा आणि लिहिते व्हा’ हे आमच्या संस्थेचे ब्रीदवाक्य असून, विविध उपक्रमांद्वारे महिला साहित्यिक घडवण्यात आले आहेत. पुढील उद्दिष्ट अखिल भारतीय महिला साहित्य संमेलन आयोजित करण्याचे आहे. संमेलनाच्या निमित्ताने कविता कठाणे यांच्या ‘विदर्भ गौरव’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यात त्यांनी संमेलन विदर्भात घेण्याची संधी दिल्याबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. प्रार्थना सदावर्ते यांनी स्वागतपर प्रस्ताविक केले, तर सूत्रसंचालन अस्मिता चौधरी, प्रतिभा चांदूरकर आणि विना डोंगरवार यांनी केले.

याप्रसंगी अश्विनी चौधरी, गायत्री हेर्लेकर, शीला गहलोत यांच्या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. परिसंवाद सत्रात डॉ. शोभा रोकडे, वसुधा वैद्य, डॉ. अनुराधा पत्की, डॉ. वृंदा कौजलगीकर यांचाही सहभाग होता. अखेरच्या सत्रात ‘काव्यसरिता’, ‘काव्यधारा’ आणि ‘काव्यसंध्या’ या कार्यक्रमांमधून विविध कवी-लेखिकांनी आपली प्रतिभा सादर केली.

Web Title: Marathi needs to skyrocket globally! Spontaneous response to Mahila Sahitya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.