मनपाच्या बजेटला कर्जाचा आधार!
By Admin | Updated: June 2, 2014 02:15 IST2014-06-02T02:15:27+5:302014-06-02T02:15:27+5:30
स्थानिक स्वराज्य संस्था कराचा (एलबीटी) नागपूर महानगरपालिकेला चांगलाच फटका बसला आहे.

मनपाच्या बजेटला कर्जाचा आधार!
नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्था कराचा (एलबीटी) नागपूर महानगरपालिकेला चांगलाच फटका बसला आहे. मनपाच्या उत्पन्नावर चांगलाच परिणाम झाला आहे. परिणामत: स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांना यंदा मनपाचे बजेट तयार करताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. माहिती सूत्रानुसार कर्जाच्या बळावर बजेट फुगविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संपूर्ण बजेट तयार झाले असून, त्यात जनतेला आकर्षित करणार्या अनेक घोषणांचा समावेश असल्याची माहिती आहे. माजी स्थायी समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी यापूर्वी १,४0१ कोटींचे बजेट सादर केले होते. परंतु मनपा आयुक्त श्याम वर्धने यांनी त्याला कात्री लावून ते १0४७ .८0 कोटींपर्यंंत कमी केले होते. तसेच २0१४-१५ चे प्रस्तावित बजेट १0६५.५१ कोटी रुपयांचे सादर करण्यात आले आहे. अशा स्थितीत बाल्या बोरकर यांनी आपले बजेट ठाकरे यांच्या बजेटपेक्षा वाढविले, तर त्यांना किमान ५00 कोटींचे कर्ज घ्यावे लागणार आहे. विशेष म्हणजे, यंदा मनपाला मार्च अखेरपर्यंंत ८0१ कोटींचे उत्पन्न झाले आहे. यामुळे आयुक्तांना प्रस्तावित बजेट सादर करण्यासाठी सुमारे २६0 कोटींची जुळवाजुळव करावी लागणार आहे. शिवाय जेएनयूआरएम योजनेतील अनेक कामे रखडली आहेत. त्यासाठी मनपाला वेगळी तरतूद करावी लागणार आहे. यंदाच्या मनपा बजेटमध्ये नवीन क्र ीडा संकुल व रुग्णालयांसह सामान्य जनतेला आकर्षित करणार्या घोषणांचा समावेश असण्याची शक्यता आहे. अलीकडेच केंद्रात भाजपची सत्ता स्थापन झाली आहे. त्यामुळे केंद्राकडूनही मनपाला भरीव मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)